(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे 99 टक्के स्थलांतरण पूर्ण; 1 जानेवारीपासून कामाला सुरुवात होणार
Navi Mumbai Airport : सिडकोकडून आतापर्यंत एकूण 99 टक्के लोकांचं स्थलांतर करण्यात आलं असून त्यामुळे नवी मुंबई विमानतळाचं काम सुरु होणार आहे.
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणाऱ्या 10 गावांचे पुनवर्सन करण्यात सिडकोला यश आले आहे. येत्या 1 जानेवारी पासून विमानतळाच्या कामाला जोरदार सुरवात होणार आहे. प्रकल्पग्रस्तांचे पुनवर्सन करण्यात सिडकोला गेल्या अनेक वर्षापासून यश येत नसल्याने विमानतळाचा प्रकल्प गेल्या 10 ते 12 वर्षापासून रखडलेला होता. मात्र आता जवळपास 99 टक्के गावकऱ्यांचे यशस्वी पुनवर्सन करण्यात सिडकोला यश आले आहे.
नवी मुंबई आणि पनवेलच्या मध्यभागी तीन हजार एकर जागेत सिडको नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी करीत आहे. यासाठी जवळपास 20 हजार कोटी रूपये खर्च येणार असून तीन हजार कोटींची कामे सिडको करणार आहे. तर 17 हजार कोटी रूपयांची कामे अदानी कंपनी करणार आहे. सध्या सिडकोने सर्वात मोठा डथळा ठरत असलेल्या येथील 10 गावांचे पुनवर्सन पूर्ण केले आहे. येथील गावकऱ्यांना दिलेल्या जमिनीच्या बदल्यात 22.5 टक्के विकसित भूखंड, तोडलेल्या घरांच्या जागेएवढी जमीन आणि बांधकाम करण्यासाठीचा खर्च, विमानतळाच्या कामामध्ये हिस्सा आणि नोकरीत प्राधान्य अशा विविध योजनेचा लाभ सिडकोकडून देण्यात आला आहे.
सिडकोकडून गावकऱ्यांचे पुनवर्सन झाल्याने येथील भरावाचे काम अंतिम टप्यात आले आहे. विमानतळाच्या जागेतून जाणाऱ्या नदीला वेगळी वाट करून देणे, उच्च दाबाच्या वीज वाहिन्या भूमिगत करणे आणि डोंगराचे सपाटीकरण करणे या कामांची जबाबदारी सिडकोच्या अखत्यारीत होती. यातील जवळपास सर्व कामे सिडकोने संपवत आणली असून पुढील विमानतळ उभारण्याची कामे अदानी ग्रुपला करावी लागणार आहेत. या आधी जीव्हीके कंपनीने विमानतळाची उभारणी करण्याचे काम घेतले होते. मात्र सदर कंपनीचे आर्थिक कंबरडे मोडल्याने अदानी ग्रुपकडे विमानतळाच्या कामाचे हस्तांतरण करण्यात आले आहे. ऑगस्टपासून अदानी ग्रुपकडून काम हाती घेण्यात आले होते. माञ प्रत्यक्षात 1 जानेवारीपासून खऱ्या अर्थाने दानी ग्रुप विमानतळाच्या कामाला हात घालणार आहे.
मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात गर्दीचा लोड आहे. वर्षाला जवळपास 6 कोटी प्रवासी देश-विदेशात मुंबई विमानतळावरून प्रवास करतात. हवाई ट्रॅफिक जाम होवू लागल्याने अखेर नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. 1 डिसेंबर 2024 रोजी पहिले विमान उडेल असे संकेत सिडको एमडी संजय मुंखर्जी यांनी दिले आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा देश विदेशात जाण्यासाठी वर्षाला 60 लाखाच्या वर प्रवासी वापर करणार आहेत. त्याच बरोबर जेएनपीटी बंदर बाजूला असल्याने 1 लाख 50 हजार मेट्रीक टन कार्गो या ठिकाणावरून लोड होणार आहे. विमानतळ सुरू झाल्यावर 1 लाख थेट तर 2.5 लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती या विमानतळामूळे अस्तित्वात येणार आहे.
संबंधित बातम्या :
- Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाची अंतिम तारीख ठरली, डिसेंबर 2024 ला पहिले विमान उडणार
- विमानतळ नामकरणाबाबत केंद्र सरकारनं धोरण निश्चित करावं; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha