Mumbai : गिरणी चाळींचा विकास कधी? गिरणी चाळीतील रहिवाशांचे आंदोलन
मुंबईतील अनेक भागातील चाळींना आता 100 वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यामुळे या चाळींमध्ये राहणाऱ्या कामगारांना जीव मुठीत धरुन जगावं लागत आहे.
मुंबई : गिरणी कामगारांच्या चाळींच्या विकासाचा निर्णय लवकरात लवकर घ्या अशी मागणी राज्य सरकारकडे करत गिरणी कामगार चाळवासियांनी आज धरणे आंदोलन केलं. गेली अनेक वर्ष गिरणी चाळींच्या विकासासाठी प्रशासन दरबारी पत्रव्यवहार व मागणी केली जाते. मात्र राज्य सरकार व केंद्र सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही असा गिरणी चाळवासीयांचा आरोप आहे.
मुंबईत लालबाग, परळ , वरळी नायगाव येथे अनेक जुन्या गिरणीच्या चाळी आहेत. या चाळींना आता जवळपास 100 वर्षे पूर्ण झाली असून आता त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या चाळीत राहणाऱ्या सुमारे 6 हजार गिरणी कामगारांना जीव मुठीत धरून जगावे लागत आहे. त्यामुळे गिरणी कामगारांच्या चाळींच्या विकासाचा निर्णय घ्या यासाठी आज मुंबईतील दादर भारत माता सिनेमा पदपथावर गिरणी कामगार चाळवासियांनी धरणे आंदोलन केले.
गेली अनेक वर्ष गिरणी चाळींच्या विकासाची मागणी केली जात आहे. मात्र राज्य सरकार व केंद्र सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही असा गिरणी चाळवासीयांचा आरोप आहे. मात्र महाविकास आघाडी सरकार आल्यापासून या रहिवाशांना आपल्याला घर मिळेल आपला विकास होईल असं वाटत होतं. मात्र हे ही सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही असं गिरणी चाळीतले रहिवासी यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता तरी या चाळींचा पुनर्विकास करा म्हणत काही मागण्या घेऊन गिरणी चाळीतील रहिवासी आंदोलनाला बसलेत .
गिरणी चाळीतील रहिवाशांच्या काय मागण्या आहेत?
- बीडीडी आणि बीआयटी चाळीस प्रमाणे पाचशे स्क्वेअर फुटाचे घरे द्या.
- आता आहे त्याच जागेवर घरे द्या.
- कोणत्याही रहिवाशांवर अन्याय होता कामा नये.
- केंद्र सरकारने त्वरीत राज्य सरकारकडे जमीन हस्तांतरित करावी.
- पावसाळा येत आहे तर या चाळींमध्ये काही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार राज्य व केंद्र सरकार असेल.
मुंबईतील बंद झालेल्या कापड गिरण्यांमधील कामगारांच्या घरांचा प्रश्न अनेक वर्ष रखडला आहे. जवळपास दीड लाख गिरणी कामगार घरांसाठी पात्र आहेत. त्यापैकी गिरण्यांच्या जमिनीवर व इतर गृहप्रकल्पात काही हजार गिरणी कामगारांना घरं मिळाली होती. त्यानंतर गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचे चित्र होते. काही दिवसांपूर्वी गिरणी कामगारांनी मोर्चादेखील काढला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा देखील झाली आहे.