कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं, उदयनराजेंसोबतच्या मनोमिलनावर शिवेंद्रराजेंचं सूचक वक्तव्य
साताऱ्याच्या या दोन राजांनी एकत्र यावं, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीसद्धा अलिकडेच डोकं शांत ठेवा, असा सल्ला त्यांना दिला होता. त्यामुळे पवारांच्या शिष्टाईनं दोन राजांचं मनोमिलन होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
कल्याण : साताऱ्यातील दोन राजे उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचं मनोमिलन होणार की नाही? या प्रश्नाचं उत्तर आता जवळपास मिळाल्यात जमा आहे. कारण हे मनोमिलन होणार नाही, असं सूचक वक्तव्य आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केलं आहे.
शिवेंद्रराजे भोसले हे रविवारी बदलापुरात एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांना उदयनराजेंसोबत मनोमिलन होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असून मला त्यांच्या पाठीशी उभं राहावं लागेल, असं सूचक वक्तव्य शिवेंद्रराजे भोसले यांनी केलं.
ज्यांना ज्यांना त्रास झाला आहे, ज्यांना आपल्यावर अन्याय झाल्यासारखं वाटत आहे, अशा लोकांना मी रोखू शकत नाही. त्यांच्या भावनांचा आदर करणं हे माझं काम आहे, असं म्हणत अप्रत्यक्षरित्या त्यांनी उदयनराजेंसोबत मनोमिलन होऊ शकत नाही, असं सूचित केलं आहे.
साताऱ्याच्या या दोन राजांनी एकत्र यावं, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीसद्धा अलिकडेच डोकं शांत ठेवा, असा सल्ला त्यांना दिला होता. त्यामुळे पवारांच्या शिष्टाईनं दोन राजांचं मनोमिलन होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
मात्र शिवेंद्रराजे यांचे काही समर्थक शरद पवार यांच्या भेटीला गेले, आणि त्यांनी उदयनराजेंबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं समजत आहे. त्यानंतर आता शिवेंद्रराजेंनीही आपल्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असल्याचं सांगत मनोमिलनाची शक्यता फेटाळून लावलीय. त्यामुळे सातारच्या राजकारणातला दोन राजांमधील संघर्ष यापुढेही कायम राहण्याची शक्यता आहे.