माझा विशेष | इंदोरीकर महाराजांना टार्गेट केलं जातंय का?
इंदोरीकर समर्थक व विरोधक असे दोन गटच राज्यात तयार झाले आहेत.'माझा विशेष'च्या या विषयावर झालेल्या चर्चेत अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले.
मुंबई : इंदोरीकर महाराजांची विनोदी अंगानं जाणारी कीर्तनं आतापर्यंत प्रसिद्ध होती. पुरुष-महिलांचा-युवकांचाही या कीर्तन-प्रवचन कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळत होता आणि आजही मिळतोय. मात्र, गेल्या काही दिवसांपासून इंदोरीकरांच्या याच कीर्तन-प्रवचन कार्यक्रमांतील विविध वादग्रस्त वक्तव्यांवर सोशल मीडियातून टीका होऊ लागली. त्यातूनच मुख्य धारेतील वृत्त माध्यमांचंही याकडे लक्ष गेलं आणि हा विषय मोठा झाला. इंदोरीकरांच्या भाषेचा लहेजा, शैली ग्रामीण बाजाची आहे, हे मान्य केलं तरी त्यांच्या बोलण्यात अनेकदा महिला, तरुणी, स्त्रीयांचं वागणं-बोलणं यावर आक्षेपार्ह टिपण्ण्या असतात. त्यामुळे श्रोत्यांची जरी चार घटका करमणूक आणि अन्य काही प्रबोधन होत असलं तरी इंदोरीकर समाजमनात काय पेरतायत यावरून प्रश्न उपस्थित होऊ लागले. त्यातच नुकतीच त्यांच्या अशाच प्रवचनात त्यांनी स्त्रियांची गर्भधारणा, मुलगा-मुलगी होण्यासाठी निवडायची तिथी, स्त्रीची लक्षणे यावर काही वक्तव्ये केली ज्यामुळे वादंग झाला. यावेळी मात्र केवळ पुरोगामी-स्त्रीवादीच नव्हे, तर खुद्द वारकरी परंपरेतील मान्यवरांनीही नाराजी व्यक्त केली. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी तर इंदोरीकरांविरूद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्याचं ठरवलं आहे. त्यावरुन आता इंदोरीकर समर्थक व विरोधक असे दोन गटच राज्यात उभे ठाकलेत.
... तर कीर्तन सोडून शेती करेन, निवृत्ती महाराज इंदोरीकरांची उद्विग्न प्रतिक्रिया
'माझा विशेष'च्या या विषयावर झालेल्या चर्चेत अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले. वारकरी परंपरा, इंदोरीकरांचे दावे व त्याची शास्त्रीय सत्यता आणि पुरोगामी विचारधारा या अंगाने ही चर्चा झाली. संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी चर्चेची सुरुवात करून देताना म्हटलं की, इंदोरीकरांवर चर्चा यापूर्वीच व्हायला हवी होती. कीर्तन, प्रवचनाची मोठी परंपरा महाराष्ट्रात आहे. त्यात इंदोरीकरांचं कीर्तन बसत नाही. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकोबा यांचा जर आपण इंदोरीकरांसारखं कीर्तन करताना विचार करू शकत नाही, तर इंदोरीकरांचं कीर्तन हा आक्षेपाचा विषय ठरतो. मात्र, डॉ. मोरेंच्या या मुद्यावर आक्षेप घेताना महंत सुधीरदास यांनी म्हटलं की, वारकरी परंपरेप्रमाणेच इंदोरीकरांचं कीर्तन होतं. इंदोरीकराच्या शैलीमुळे त्यांना मोठा प्रतिसाद मिळतो अन्यथा खुद्द डॉ. मोरे जरी कीर्तनाला उभे राहिले तरी इतके लोक जमणार नाही.
महिला कीर्तनकार जयश्री तिकांडे यांनी इंदोरीकरांची ठाम बाजू घेत त्यांच्या शैलीचा बाऊ करण्याची गरज नसल्याचं स्पष्ट केलं. इंदोरीकरांवर टीका करताना त्यांनी केलेल्या समाजसेवेकडेही पाहायला हवं, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. ग्रामीण भागातल्या जनतेला जोडून घेण्यासाठी इंदोरीकर खास शैली वापरतात, याचा अर्थ ते चुकीचं वागतात असा नाही, असं मतही तिकांडे यांनी मांडलं. जर गीतेवर हात ठेवून शपथ घेतली जाते, तर इंदोरीकर सांगत असलेल्या ग्रंथांवरही विश्वास ठेवायला काय हरकत आहे, असा सवाल त्यांनी केला. दुसरीकडे, आयुर्वेदाचार्य डॉ. शिवरत्न शेटे यांनी इंदोरीकरांनी गर्भधारणेवर दिलेले दाखले हे प्राचीन आयुर्वेदिय ग्रंथात कसे आहेत हे सोदाहरण स्पष्ट केले. हे ग्रंथ आयुर्वेदातील वैद्यक पदवीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. अर्थात असे दाखले संबंधित ग्रंथाच्या पूर्ण वाचनाविना आणि प्रवचनाचा भाग म्हणून द्यावेत का? हा मुद्दा उरतोच.
इंदुरीकर महाराजांची शिक्षकांची खिल्ली उडवणारी क्लिप व्हायरल, शिक्षक संघटनाची नाराजी
सामाजिक कार्यकर्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी इंदोरीकरांवर सडकून टीका करत पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवर उघड शेरेबाजी होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी कायदेतज्ज्ञ वकील जाई वैद्य यांनी इंदोरीकरांच्या वक्तव्यांची शहानिशा करून जर त्यात अशास्त्रीय गोष्टींचा पुरस्कार केला गेला असेल तर कारवाई होऊ शकते, असं मत व्यक्त केलं. इंदोरीकरांसारख्या प्रसिद्ध आणि मोठा जनसंग्रह असलेल्या कीर्तनकारांनी आपल्या बोलण्याचा कसा प्रभाव पडतो, याची काळजी घ्यायला हवी असं मतंही त्यांनी व्यक्त केलं.
...तर रस्त्यावर उतरु; इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ वारकरी सांप्रदाय सरसावला
सर्वात मोठे सेलिब्रिटी इंदुरीकर महाराज | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा