स्त्रीसंग सम तिथीला झाल्यास मुलगा आणि विषम तिथीला झाल्यास मुलगी होते, इंदुरीकर महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य
निवृत्ती महाराज इंदोरीकर यांना कीर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. PCPNDT कायद्याच्या कलाम 22 चं हे उल्लंघन असल्याचा आरोप याच समितीच्या सदस्याने केला असून त्यांना तशी नोटीसही पाठवली आहे.
अहमदनगर : प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांना कीर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. अहमदनगरच्या PCPNDT समितीने ही नोटीस पाठवली आहे. इंदोरीकर महाराज यांनी ओझर येथे आपल्या कीर्तनात 'स्त्रीसंग सम तिथीला झाला, तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते' असं वक्तव्य केलं होतं. इंदुरीकरांच्या किर्तनाचा व्हिडिओ 'मराठी कीर्तन व्हिडिओ' या युट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आला होता.
निवृत्ती महाराज इंदुरीकर महाराज काय बोलले?
'स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माल आला.'
मात्र हे वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून PCPNDT कायद्याच्या कलाम 22 चे उल्लंघन असल्याचा आरोप याच समितीच्या सदस्याने केला. त्यानुसार PCPNDT सल्लागार समितीने निवृत्ती महाराज इंदोरीकर यांना नोटीस पाठवून खुलासा मागितला आहे. इतकेच नाही तर या नोटीस नंतर जर पुरावे मिळाले तर इंदोरीकर महाराजांवर गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहे.
निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी आज पर्यंत आपल्या कीर्तनातून सामाजिक, राजकीय क्षेत्रातील ज्वलंत विषयावर कीर्तन करून अनेकांची मने जिंकली आहे. मात्र गर्भलिंग निदान बाबत विधान केल्याने इंदोरीकर महाराजांच्या भोवती कायद्याचे फास आवळले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कलम - 22 , गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा
अमुकतमुक केल्यानं मुलगा किंवा मुलगी होईल, यासंदर्भात कोणत्याही प्रकारची जाहीरात किंवा प्रचार हा गुन्हा ठरतो. गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्षांपर्यंतची शिक्षा आणि दहा हजार रुपयापर्यंतचा दंड या शिक्षा होऊ शकतात.