'बाळासाहेबांची शिवसेना' नाव मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार...
Balasahebanchi ShivSena : वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत, असं शिंदे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.
Eknath Shinde Balasahebanchi ShivSena : निवडणूक आयोगाकडून (Election Commission )आज उद्धव ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव तर मशाल हे चिन्ह मिळालं आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्या वतीनं आज निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि नावासाठी कागदपत्र जमा केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 10, 2022
आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार…. #बाळासाहेबांची_शिवसेना pic.twitter.com/8UwEMxP3VC
हा निर्णय आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत, असं शिंदे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, चिन्ह उद्या दिली जातील, आम्ही दिलेली चिन्ह रद्द केली असली तरी उद्या सकाळी आम्हाला एक चिन्ह मिळेल. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना म्हणून आम्ही भूमिका घेतली होती. आज निवडणूक आयोगाने आम्हाला 'बाळासाहेबांची शिवसेना' म्हणून पक्षाच्या नावाला मान्यता दिली आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, असं शिंदे म्हणाले.
दोन्ही गटांच्या नावातील दुसरा पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव देण्यात आलं आहे. तर त्यांना 'मशाल' हे चिन्ह देण्यात आलं आहे. तसेच शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव देण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी त्रिशूल या चिन्हाची मागणी केली होती. हे धार्मिक चिन्ह असल्याने हे देता येत नाही. तसेच उगवता सूर्य हे तामिळनाडूतील पक्षाचं चिन्ह असल्याने हे चिन्ह देता येणार नाही असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. त्यामुळे तिसरा पर्याय म्हणून मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे.
शिंदे गटाला नव्याने तीन चिन्हं द्यायचे निर्देश
शिंदे गटाने उगवता सूर्य, त्रिशूळ आणि गदा या चिन्हांचा पर्याय देण्यात आला होता. पहिल्या दोन चिन्हांबाबत निवडणूक आयोगाने आधीच भूमिका स्पष्ट केली. तर गदा हे चिन्ह धार्मिक चिन्ह असल्याने ते देता येणार नाही असं सांगत शिंदे गटाने तीन नव्या चिन्हांचा पर्याय द्यावा असं सांगितलं आहे.