एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
तेव्हा सरकारनं साथ दिली असती तर आज राज्यात एकाही मशिदीवर भोंगा राहिला नसता, असे म्हणत पुन्हा एकदा राज यांनी पुन्हा एकदा भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला.
मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठी दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 8 नो्व्हेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. तर, राज्यातही महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांच्या प्रचारसभा सुरू झाल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भानंतर आजपासून मुंबईतील मतदारसंघात सभा घेत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) घाटकोपर (प) विधानसभेचे उमेदवार गणेश चुक्कल यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंनी (Raj Thackeray) घाटकोपर येथे सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी मुंबईकरांना भावनिक आवाहन केल्याचं पाहायला मिळालं. सारखं सभामध्ये नवीन काय बोलणार, आज अमरावतीहून आलो, उद्या परत गुहाघरला जायचंय. पण, तरीही आपल्याकडे विषयांची काही कमी नाही, असे म्हणत मुंबईचा नुसता विचका झाल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं. मुंबईत किती गाड्या येतायत, किती लोकं येतायत, फुटपाथ उरलेले नाहीत, असे म्हणत मुंबईची तुंबई झाल्याचं त्यांनी सूचवलं.
मनसेनं आजवर केलेल्या कामांचं एक पुस्तक काढलंय, बाकी कुठल्या पक्षात हिंमत आहे का?. सन 2006-2014 सारखं पत्रकार विचारायचे, "काय ते ब्लू प्रिंटचं काय झालं"?. 2014 ला ती आणली कोणी पाहिली?, असा सवाल राज यांनी विचारला. मनसेनं इतकी वर्षे आंदोलनं केली, तेव्हा मुंबईत टोलनाके बंद झाले, पण त्याचं श्रेय आम्हाला कुणी देत नाही. मराठी पाट्या मनसेमुळे आज मुंबईच्या दुकानांवर दिसत आहेत. पाटी स्वस्त की दुकान?, म्हणून त्यांनी पाट्या मराठीत केल्या, मोबाईल फोन कंपन्यांना दणका दिला, तेव्हा संदेश मराठीतून आले. मशिदींवरच्या भोग्यांसमोर हनुमान चालिसा लावली तेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, तीन प्राण्यांचं ते सरकार होतं. मशिदींवरच्या भोग्यांबाबत 17 हजार मनसैनिकांवर गुन्हे दाखल केले, अनेक मुसलमानांनीही भोग्यांच्याविरोधात मनसेचं कौतूक केलं. तेव्हा सरकारनं साथ दिली असती तर आज राज्यात एकाही मशिदीवर भोंगा राहिला नसता, असे म्हणत पुन्हा एकदा राज यांनी पुन्हा एकदा भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला.
पुढच्या 2 दिवसांत मनसेचा जाहीरनामा येतोय, त्यात एक गोष्ट नक्कीय की, राज्यातील एकाही मशिदीवर भोंगा दिसणार नाही. रस्त्यांवरील नमाज पठणही बंद करणार, सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा आहे, यामुळे लोकांची लक्षात ठेवण्याची ताकद कमी झालीय. पण, मनसेनं ज्या गोष्टी केल्यात त्या कायमस्वरूपी आहेत. रेल्वे भरतीसाठी मनसेनं आंदोलन केलं, कारण इथल्या नोकऱ्या बाहेरच्या राज्यातील तरूणांना दिल्या जात होत्या. या परिक्षांची इथं जाहिरात दिली जात नव्हती, याला जबाबदार कोण?. इथून दिल्लीत जाणाऱ्या खासदार मंत्र्यानी काय केलं?, यावर संसदेत का कुणी बोललं नाही? जर हे महाराष्ट्राच्या उपयोगीच पडणार नसतील तर का निवडून द्यायचं यांना?, असा सवाल राज यांनी विचारला.
तर माझं दुकान बंद करुन टाकेन
मनसेच्या त्या आंदोलनानंतर ममता बॅनर्जींनी त्याची दखल घेतली, ही सारी आंदोलनं सत्ता नसताना केली. हल्ली राज्यात लहान मुलीही सुरक्षित नाहीत, बदलापुरात अशी घटना घडते?. कशासाठी आणि कुठल्या निवडणुका घेताय?. आता तुम्हाला विविध प्रलोभन दिली जातील, पण मतदानाच्या दिवशी तुमचा कणा शाबूत ठेवा. एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन, अशा शब्दात राज ठाकरेंनी मुंबईकरांना व जनतेला भावनिक आवाहन केलं.
बदला घेण्याची हीच ती वेळ
मराठ्यांनी देशावर राज्य केलंय, अटकेपार झेंडे रोवलेत. हिंद प्रांतावर सत्ता गाजवणारा हा एकमेव प्रांत, बाकी सगळे बाहेरून आले होते, सध्या परत तेच सुरूय, कुणीही कुठेही जातंय, विकलं जातंय. इथले दोन उमेदवार तर इथलेच होते, पण गणेश चुक्कल आमचाय तेव्हा संधी परत परत येत नसते, आत्ता गेली तर परत पाच वर्षांनी येणार. आज हा जो चिखल झालाय, सकाळी टिव्हीवर येऊन एकमेकांना शिव्या देतायत, यांना धडा नाही शिकवला, तर त्यांना वाटेल ते जे करतायत ते बरोबर करतायत. हा तुमचा अपमान आहे, त्याचा बदला घेण्याची हीच ती वेळ आहे, असेही राज ठाकरेंनी म्हटले.