Devendra Fadnavis: ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती का? देवेंद्र फडणवीसांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Devendra Fadnavis: ठाण्यामध्ये एका कारणामुळे त्यांनी शिवसेनेसोबत युती केल्याचे आणि जागावाचपामध्ये नमतं घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ठाणे: राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काही ठिकाणी मोठ्या पक्षांनी युती केली आहे, तर काही ठिकाणी सर्व पक्षांनी आपली ताकद दाखवण्यासाठी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाणे महानगरपालिकेमध्ये महायुतीच्या जागावाटपाबाबत सविस्तर भाष्य केले आहे. ठाण्यामध्ये एका कारणामुळे त्यांनी शिवसेनेसोबत युती केल्याचे आणि जागावाचपामध्ये नमतं घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे. (Devendra Fadnavis)
Devendra Fadnavis: सर्वांची इच्छा होती की, आपण स्वंतत्रपणे लढावं
ठाणे भाजपतर्फे काल (बुधवारी, ता ७) ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये ‘आपलं ठाणे, आपला देवाभाऊ’ या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेतली, यावेळी बल्लाळ यांनी मुंबईत जो तुम्ही हट्ट ठेवला होता, तो तुम्ही ठाण्यात सोडून दिला, तर आज तुम्ही सांगून टाका की नेमकं काय झालं कसं झालं? आता भाजपचे २४ नगरसेवक आहेत, तुमचे नगरसेवक वाढण्याची आणखी शक्यता होती, अशी कार्यकर्त्यांची भावना होती. त्यांची समजूत तुम्ही कशी घालाल या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितलं की, एक गोष्ट खरी आहे की, ठाण्याचे जे आमचा पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्ते सगळे होते, सर्वांची इच्छा होती की, आपण स्वंतत्रपणे लढावं, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
Devendra Fadnavis: ....म्हणून ठाण्यात शिवसेना आणि भाजप एकत्रित
पुढे फडणवीस म्हणाले, कारण शेवटी ही जी निवडणूक आहे, ही एक प्रकारे दहा वर्षांनंतर आलेली निवडणूक आहे, प्रत्येक जी निवडणूक आहे, त्या निवडणुकीनंतर एक पिढी तयार होते,२०१७ च्या निवडणुकीनंतर एक पिढी तयार झाली, २०२२ च्या निवडणुकीकरता पण एक पिढी निर्माण झाली, २२ नंतर आणखी एक पिढी निर्माण झाली, पण दोन पिढ्या एकत्रितपणे निवडणुकीला सामोऱ्या चालल्या आहेत. त्या प्रत्येक पक्षातील आहेत, अशा परिस्थितीमध्ये आपण जर या ठिकाणी युती केली, तर आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देता येणार नाही, त्यांना लढवता येणार नाही आणि आज शेवटी भाजप हा मोठा पक्ष आहे, ठाण्यामध्ये वर्षानुवर्षे शिवसेना आम्ही युतीत लढलो, ठाण्यामध्ये शिवसेना बलशाली पक्ष म्हणून राहिले आहेत. पण आमच्या पक्षातील लोकांना असं वाटतं होतं की, आपली शक्ती वाढलेली आहे. आपण जास्त नगरसेवक आणू शकतो. आपण ही ठाण्यात स्वतंत्रपणे लढलं पाहिजे त्यांनी त्याकरता आग्रह धरला.आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील आग्रह धरला.आम्ही सगळ्यांनी सांगितलं की,आपण आता या परिस्थितीमध्ये जी काही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, ती शिवसेना आणि त्याचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे आलेलं आहे. ही शिवसेना ते चालवत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण केवळ या छोट्या कारणाकरिता वेगवेगळे लढलो... वेगळे लढलो असतो तर सत्ता आली असती, पण त्यातून कुठेतरी आपली मने दुखावतील. आज ठाण्यासारख्या शहरामध्ये जे बाळासाहेब ठाकरेंचं आवडीचं शहर होतं, त्या शहरामध्ये असा पध्दतीचा वाद विवाद सर्व होणं हे काही योग्य नाहीये, त्यामुळे आवश्यकता पडली तर आपण थोडी पडती बाजू घेऊ, कमी जागा आपण घेऊ पण आपण युतीमध्ये लढू, मी सांगितल्यानंतर आमच्या पक्षातील सर्वांनी ऐकलं. आम्ही कमी जागा घेतल्या, आज आम्ही सोबत लढतो आहोत, मला हे निश्चितपणे माहिती आहे की, आमचा निर्णय बरोबर आहे, मुंबईतही आमचा निर्णय योग्य आहे, असंही पुढे देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
Devendra Fadnavis: ठाण्यात मुख्यमंत्र्यांची मुलाखत
ठाणे भाजपतर्फे बुधवारी ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये ‘आपलं ठाणे, आपला देवाभाऊ’ या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेतली. ठाण्यातील दळणवळण, कचरा प्रश्न, पाणीपुरवठा, शिक्षण आणि रोजगार अशा विविध विषयांवर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.























