Narayan Rane : राजकीय नेत्यांनी शब्द जपून वापरले पाहिजेत, मतभेद असावेत मनभेद नकोत : सुधीर मुनगंटीवार
Narayan Rane : कोणत्याही नेत्यांकडून अशा शब्दांचा वापर करणं चुकीचं, बाळासाहेब थोरात संयमी नेते, जयंत पाटील संयमाने बोलतात.
मुंबई : नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात आणि भाजप-शिवसेना राड्यासंदर्भात भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी भाष्य केलं आहे. राणेंच्या वक्तव्यासंदर्भात बोलताना म्हटलं की, सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी शब्द जपून वापरले पाहिजे. मतभेद असावेत मनभेद नकोत असा टोला देखील त्यांनी राणेंना लगावला आहे. त्याचसोबत कार्यकर्त्यांच्या राड्याबाबत बोलताना कार्यकर्त्यांनी संयमाची भूमिका घ्यावी. नेत्यांवरील केसेस मागे घेतल्या जातील मात्र कार्यकर्त्यांवरच्या केसेस तशाच राहतील, असं वक्तव्य देखील सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.
मागील दीड वर्षात अनेक अशा गोष्टी घडतायत ज्यावर राजकीय पक्षाच्या शीर्ष नेत्यांची एकत्र आलं पाहिजे. देवेंद्र फडणवीसांना कोरोनाचे जंतू तोंडात सोडू बोललं जातं, अनेक जण जाहीर धमक्या देतात. प्रश्न एका शब्दाचा नाही, नारायण राणे जे बोलले ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. राज्यपालांबाबत वक्तव्य, मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द, विरोधी पक्ष नेत्यांबाबतचं वक्तव्य, मला वाटतं जनतेला याची लाज वाटते, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं.
Narayan Rane Arrested : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक
कोणत्याही नेत्यांकडून अशा शब्दांचा वापर करणं चुकीचं, बाळासाहेब थोरात संयमी नेते, जयंत पाटील संयमाने बोलतात. आपल्याला सर्वांनाच एकत्रित येत विचार करण्याची गरज आहे. राणे साहेब बोलले म्हणून फक्त राडा करायचा पण राज्यपालांबाबत बोलताना ती शैली आहे किंवा फडणवीसांबाबत बोलताना कोरोनाचे जंतू तोंडात सोडू असं म्हणायचं तेव्हा मात्र फेव्हिकॉल टाकल्यासारखे ओठ चिकटवून ठेवायचे हे योग्य नाही, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं.
केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रकरणावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शब्द जपून वापरले पाहिजे, आणि यासंदर्भात स्व:त मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. मतभेद विचारांचे असावे, मनभेद होता कामा नये. महाराष्ट्रातील पुरोगामी परंपरा टिकली पाहिजे, फक्त आता पुरताच विचार करता कामा नये. टीका करताना व्यक्तिगत स्तरावर ती येऊ नये, असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं. चंद्रकांत पाटील यांना जे नाव ठेवलं जातं ते देखील चुकीचं आहे, मग आरेला कारे आणि आरेला मारे होणारच, असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं.