Anil Deshmukh Case : अनिल देशमुखांच्या जवळच्या नातेवाईकांच्या कॉल रेकॉर्डिंगची CBI तपासणी करणार
Anil Deshmukh Case : अनिल देशमुखांच्या जवळच्या नातेवाईकांच्या कॉल रेकॉर्डिंगची CBI तपासणी करणार आहे. ज्यामध्ये पोलिसांच्या बदल्यांसंदर्भातील संभाषण असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबई : अनिल देशमुख यांच्या अडचणी काही कमी होण्याचं नाव घेत नाहीत. शंभर कोटी वसुली प्रकरणी सीबीआयकडून कसून चौकशी करण्यात येत असून आता अनिल देशमुख यांच्या जवळच्या नातेवाईकाच्या कॉल रेकॉर्डिंगची तपासणी सीबीआय करणार आहे. ज्यामध्ये पोलिसांच्या बदल्या संदर्भातलं संभाषण असण्याची शक्यता असल्याचं वर्तविण्यात येत आहे.
सीबीआयकडून काही दिवसांपूर्वी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला गेला होता. ज्यामध्ये रश्मी शुक्ला यांनी अनिल देशमुख यांच्या जवळच्या एका नातेवाईकाचं संभाषण सीबीआयला दिलं होतं, ज्यामध्ये पोलिसांच्या बदल्या संदर्भातील संभाषण होतं. ज्यामुळे सीबीआय आता त्या संभाषणाची तपासणी करत असून या प्रकरणात पुढील तपास करत आहे. या संभाषणांमध्ये नेमकी ती व्यक्ती कोणाशी बोलत होती? कुठल्या बदल्यांसंदर्भात बोलत होती. या सगळ्यांची माहिती आता सीबीआयकडून गोळा केली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात या नातेवाईकांची चौकशी सीबीआयकडून केली जाऊ शकते.
रश्मी शुक्ला यांच्याकडे जेव्हा महाराष्ट्र स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट (SID)चा कारभार होता. त्यावेळी त्यांनी सरकारमधील काही लोकांचे फोन टॅप केले होते. त्यामध्ये बदल्यासंदर्भातले संभाषण होतं आणि त्याचा रिपोर्ट त्यांनी तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जैसवाल यांना दिला होता. मात्र ही कॉल रेकॉर्डिंग त्यांनी त्यावेळी सादर केली नव्हती. सुबोध जैसवाल यांनी तो रिपोर्ट मुख्यमंत्र्यांकडे पुढील चौकशीसाठी सादर केला होता. मात्र हे प्रकरण तेव्हा उघडकीस आलं जेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा रिपोर्ट सादर करत एकच खळबळ उडवली. रश्मी शुक्ला यांच्या रिपोर्टमध्ये काही अधिकाऱ्यांची नावही होती. त्यांनी आपल्या बदलीसाठी पैशांसंदर्भात बोलणी केली होती. ज्याची चौकशी सीबीआईने केली.
शंभर कोटी वसुली प्रकरणात सीबीआयकडून तपास केला जात असून त्याबरोबरच पोलीस दलातील बदली प्रकरणाची सुद्धा चौकशी सीबीआय करत आहे. ज्यामध्ये नवीन खुलासे होत आहेत. येणाऱ्या दिवसात या प्रकरणात अजून काय नवीन उलगडा होतोय? ते पाहणं महत्त्वाच असणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
