(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत नवी अपडेट, 50 लाख महिलांच्या खात्यात 'या' दिवशी येणार तीन हजार
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात 31 ऑगस्टला 3 हजार रुपये पाठवले जाणार आहेत.
मुंबई : महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे महिलांच्या खात्यात दरमहा 1500 प्रमाणं एका वर्षात 18 हजार रुपये पाठवले जाणार आहेत. राज्य सरकारनं ही योजना महत्त्वकांक्षी योजना म्हणून राबवली आहे. या योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून करण्यात आली होती. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात पाठवण्यात आले आहेत. आता ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिलांच्या खात्यात 31 ऑगस्टला पैसे पाठवले जाणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
31 ऑगस्टला कुणाच्या खात्यात येणार 3 हजार रुपये?
लाडकी बहीण योजनेचा दुसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. हा मेळावा 31 ऑगस्टला होणार आहे. या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली. दुसरा राज्यस्तरीय डीबीटी निधी वितरण सोहळा 31 ऑगस्टला नागपूरमध्ये होत आहे. ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आहेत. त्यांच्या अर्जांची छाननी सुरु असून त्यांना 31 ऑगस्टला पैसे मिळतील, असं अदिती तटकरे म्हणाल्या.
ऑगस्ट महिन्यात आलेल्या अर्जांनुसार नागपूरच्या कार्यक्रमात 45 ते 50 लाख महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत. यापूर्वी पुण्यात पहिला राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा पार पडला होता. त्यावेळी जुलै महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिला अर्जदारांपैकी पात्र ठरलेल्या 1 कोटी आठ लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये वर्ग करण्यात आले होते.
राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नारी शक्ती एप मधून अर्ज दाखल करुन घेतले होते. ज्या महिलांच्या खात्यात सरकारनं पैसे पाठवले होते त्यामधील काही रक्कम बँकांनी कपात केली होती. मात्र, राज्य सरकारनं बँकांना आदेश देत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशांची कपात न करता ते महिलांना द्यावेत, असे आदेश दिले होते.
राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचार प्रसारासाठी विविध जिल्ह्यात कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. त्याशिवाय पुण्यातील पहिल्या राज्यस्तरीय निधी वितरण सोहळ्यानंतर आता दुसरा सोहळा नागपूरमध्ये आयोजित केला जाणार आहे.
इतर बातम्या :
लाडक्या बहिणींचं टेन्शन मिटलं! सर्वांत मोठी अडचण दूर; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय!