एक्स्प्लोर
बेळगावात पत्नीने सैनिक पतीला झोपेतच पेटवलं

बेळगाव: झोपलेल्या पतीच्या अंगावर रॉकेल ओतून त्याला पेटवून मारल्याची धक्कादायक घटना बेळगावात घडली. पोलिसांनी पतीला पेटविणाऱ्या पत्नीला अटक केली आहे. बेळगावमधील सैनिकनगर भागात ही घटना घडली. दीपक भुजंग पवार हे लष्करात नाईक म्हणून सेवा बजावत होते. दीपक पवार हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील आंबवडे गावचे होते. सध्या त्यांची पोस्टिंग बेळगाव इथं होती. सैनिकनगर इथं ते आपली पत्नी सविता आणि आठ वर्षाच्या मुलासह भाड्याच्या घरात राहात होते. पती- पत्नीत काही कारणामुळे वाद होत होते. त्यामुळे पत्नीने पंधरा दिवसापूर्वी मध्यरात्री झोपलेल्या पतीच्या अंगावर रॉकेल ओतून त्याला पेटवले. पेटल्यावर दीपक याने आरडाओरडा केला. तो ऐकून आजूबाजूचे जागे झाले आणि त्यांनी त्याला लष्कराच्या दवाखान्यात दाखल केले. पण त्याची स्थिती अधिक गंभीर झाल्यामुळे त्याला के एल ई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण नव्वद टक्के भाजला गेला असल्यामुळे दीपक मृत झाला. मृत्यूपूर्व जबानीत दीपकने आपला आणि पत्नीचा वाद होत असल्याचे सांगितले. दीपकची पत्नी सविता ही पोलिसांना तपासकार्यात एकदम चांगले सहकार्य करत असल्यामुळे आणि न घाबरता पोलिसांच्या प्रश्नांना सफाईदारपणे उत्तरे देत असल्यामुळे पोलिसांना प्रारंभी तिचा संशय आला नाही. पण नंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता, सविताचे परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचं समोर आलं. त्यातूनच ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. यानंतर पोलिसांनी सविताला कोल्हापूर जिल्ह्यातील तिच्या माहेरातून अटक केली. सध्या तिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून सविताची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.
आणखी वाचा























