एक्स्प्लोर
Advertisement
पालघरमध्ये चोर असल्याचं समजून जमावाकडून तिघांची हत्या
पालघरमध्ये चोर असल्याचं समजून जमावाकडून तिघांची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना आहे.
पालघर : कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी असताना कांदिवली (मुंबई) येथून गुजरात राज्यात आडमार्गाने प्रवेश घेऊ पाहणार्या तीन व्यक्तींची महाराष्ट्र व दादरा नगरहवेली केंद्रशासित प्रदेशाच्या हद्दीजवळ डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे गावकऱ्यांनी अमानुषपणे मारहाण करून निर्घृणपणे हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी 110 हल्लेखोरांना ताब्यात घेतल असून पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावाला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आले आहे. चिकणे महाराज कल्पवृक्षगिरी (70 वर्ष), सुशिलगिरी महाराज (35 वर्ष), निलेश तेलगडे (30 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत.
कांदिवली (मुंबई) येथील दोन साधूमहाराज गुजरात राज्यातील सुरतमध्ये आपल्या मित्राच्या अंत्यविधीसाठी जाण्याचा प्रयत्न करीत होते. राष्ट्रीय महामार्गावर चारोटीजवळ त्यांना रोखले गेल्याने त्यांनी विक्रमगड मार्गे दाभाडी- खानवेल या मार्गावरून दादरा नगरहवेलीकडे आगेकूच करत होते. कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गडचिंचले गावाजवळ असलेल्या वन विभागाच्या चौकीजवळ गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तेथील ग्रामस्थांनी गाडी रोखून गाडीमधील प्रवाशांना मारहाण सुरू केली होती. ही बाब कासा पोलिसांना रात्री दहा वाजता समजल्यानंतर पालघर जिल्हा परिषदेचे सभापती काशिनाथ चौधरी व कासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व सुमारे वीस-पंचवीस पोलीस कर्मचारी घटनास्थळी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पोहोचले. त्यांनी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या या तिघांना पोलीस वाहनांमध्ये ठेवल्यानंतर मोठ्या संख्येत असलेल्या जमावाने पोलीस वाहनावर देखील जबर दगडफेक करून पोलिसांना पळवून लावले. त्यानंतर दगड, काठ्या व इतर साहित्याने मारहाण करत या तिघांची अमानुषपणे हत्या केली.
पालघर पोलीस अधीक्षक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी व दोनशे पोलिस कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. या प्रकारात अजूनपर्यंत 110 ग्रामस्थांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध हत्या करण्याचा प्रयत्न व इतर कलमे लावण्यात आली आहेत.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी असताना चोर, दरोडेखोर व मुत्रपिंड काढण्यासाठी नागरिक वेशांतर करून येत असल्याची अफवा गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पसरली आहे. परिणामी अंधार झाला की अनेक गावांमध्ये स्थानिक मंडळी बाहेर गावाहून येणाऱ्या वाहनांना थांबून जाब विचारणे व वेळप्रसंगी मारहाण करण्याचे प्रकार घडले आहेत. दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कायदा हातात घेऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांनी केले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
निवडणूक
भारत
Advertisement