जळगावमध्ये डंपर-क्रूझरच्या अपघातात 11 जणांचा मृत्यू, यावल-फैजपूर मार्गावरील घटना
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात हिंगोणे गावाजवळ झालेल्या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण यामध्ये जखमी झाले आहेत.
जळगाव : जळगावमध्ये डंपर आणि क्रुझरमध्ये झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर सात जण जखमी आहे. यावल तालुक्यातील यावल-फैजपूर रस्त्यावरील हिंगोणे गावाजवळ ही घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील मेहुन आणि निंबोल गावातील महाजन, पाटील आणि चौधरी कुटुंबीय विवाह समारंभासाठी चोपडा येथे क्रूझर गाडीने निघाले होते. चोपडा येथील विवाह समारंभाहून रात्रीच्या वेळेस परत येत असताना यावल तालुक्यातील हिंगोणे गावाजवळ दिपनगरहबन राखेने भरलेल्या डंपरने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला, तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचोल गावच्या बाळू नारायण चौधरी यांच्या मुलीच्या विवाहनंतर तिच्या सासरी चोपडा येथे कार्यक्रमांकाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमानंतर परतत असताना हा अपघात झाला. या अपघातात नवरीचे वडील बाळू चौधरी त्यांच्या पत्नी मंगला चौधरी यांचाही मृत्यू झाला आहे.
मृतांची नावं
मंगलाबाई ज्ञानेश्वर चौधरी (वय 65), प्रभाकर उर्फ बाळू नारायण चौधरी (वय 60), प्रभाबाई प्रभाकर चौधरी (वय 40), आश्लेषा उमेश चौधरी (वय 28), रिया जितेंद्र चौधरी (वय 21), सोनाली जितेंद्र चौधरी (वय 34), प्रियांका नितीन चौधरी (वय 29) हे सर्व मुक्ताईनगर येथे राहणारे आहेत. तर सोनाली सचिन महाजन (वय 34), सुमनबाई श्रीराम पाटील (वय 55) आणि संगीता मुकेश पाटील (वय 40) हे रावेर येथे राहणारे आहेत.
जखमींची नावं
सर्वेश नितीन चौधरी (वय 9) , शिवम प्रभाकर चौधरी, मीना प्रफुल चौधरी (वय 30), सुनिता राजाराम पाटील, धनराज गंभीर कोळी (क्रूझर चालक) हे चिंचोल येथे राहतात. आदिती मुकेश पाटील ही निंबोल येथे राहते. तसेच डंपर चालक मुकुंदा गणेश भंगाळे हे यावल येथे राहतात.
जळगावचा रस्ते अपघातात राज्यात पाचवा क्रमांक
जळगाव जिल्ह्याचा रस्ते अपघातात राज्यात पाचवा क्रमांक लागतो. वर्षभरात जळगाव जिल्ह्यात 454 अपघात झाले आहेत. राज्यभरात रस्ते अपघातात वर्षभरात 12,565 जणांचा मृत्यू झालाय. राज्यात जानेवारी ते डिसेंबर 2019 या एक वर्षाच्या कालावधीत 32 हजार 876 रस्ते अपघात झाले. त्यात 12 हजार 565 जणांचा मृत्यू झाला. 2019 मध्ये सर्वाधिक 2 हजार 856 अपघात मुंबईत झाले. त्यात 405 जण ठार झाले. सर्वात जास्त 873 जण औरंगाबाद जिल्ह्यात तर त्याखालोखाल 855 जण पुणे जिल्ह्यात ठार झाले आहेत. नाशिक जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असून तेथे 783 जणांचा मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 65 अपघातात 531 जण ठार झाले आहेत. जळगाव जिल्हा राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. 835 अपघातात 454 जण ठार झाले. 2018 मध्ये राज्यात 35 हजार 717 अपघात झाले होते. त्यात 13 हजार 261 जणांचा मृत्यू तर 31 हजार 265 जण जखमी झाले होते. तरुणांचीच सर्वाधिक संख्या अपघातात 40 वर्षांच्या आत मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. चिंतेची बाब म्हणजे महामार्गावरच सर्वाधिक अपघात झाले आहेत.
संबंधित बातम्या