Baramati news : 'हे' उमेदवार मत मागायला आल्यास अपमान करण्यात येईल; बारामतीमध्ये अनोख्या फ्लेक्सची चर्चा
समाजकंटक, भ्रष्टाचारी आणि भ्रष्टाचाराला अभय देणाऱ्या उमेदवार मत मागण्यासाठी आल्यास अपमान करण्यात येईल, अशा आशयाचा बारामतीमधील बोर्ड सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
Baramati news : बारामती (Baramati) तालुक्यात सध्या एका फ्लेक्सची चांगलीच चर्चा रंगली आहे. समाजकंटक, भ्रष्टाचारी आणि भ्रष्टाचाराला अभय देणारे उमेदवार मत मागण्यासाठी आल्यास अपमान करण्यात येईल, अशा आशयाचा बोर्ड सध्या चर्चेचा विषय बनला आहे. बारामती तालुक्यातील वाघळवाडीमध्ये सुरेश यादव यांच्या घराबाहेर अशा आशयाचा फ्लेक्स लावल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
राज्यामध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. बारामती तालुक्यातील वाघळवाडी हे गाव नेहमीच चर्चेत राहिलेले आहे. यादव यांच्या घराबाहेरील हा बॅनर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बारामती तालुक्यात वाघळवाडी सोमेश्वर ग्रामपंचायतीसह 13 ग्रामपंचायतची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी वाघळवाडी गावातून सरपंचपदासाठी 13 तर सदस्यपदासाठी 60 जणांनी फॉर्म भरलेले आहेत.
वाघळवाडी सोमेश्वर नगर गावातील सुरेश किसनराव यादव यांनी आपल्या घरावर एक बॅनर लावला असून तो बॅनर सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. सुरेश यादव हे सरपंचपदासाठी इच्छुक उमेदवार होते, परंतु त्याचं मतदार यादीतून नाव उडवण्यात आलं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून सुरेश यादव यांनी असा फ्लेक्स घराबाहेर लावला आहे. याआधी सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये संचालक पदाला डावलल्यामुळे नाराजी दाखवत काळ्या बोर्डवर केळ्याचे चित्र असलेले बॅनर झळकले होते त्याची संपूर्ण राज्यभर चर्चा झाली होती.
मतदार यादीतून नाव वगळलं
राज्यात सगळीकडेच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठीची रणधुमाळी सुरु आहे. गावागावात अनेकांची अर्ज केले आहेत आणि अनेकांनी निवडणुकीची तयारी देखील सुरु केली आहे. बारामतीतील वाघळवाडी गाव कायम चर्चेत राहणारं गाव आहे. सुरेश यादव म्हणाले की सर्व मागासवर्गीय सुचित करण्यासाठी हा फ्लेक्स लावला आहे. मागील वीस वर्षांपासून अनेक सोयीसुविधांसाठी गावकरी प्रयत्न करत आहेत. मात्र कोणताही प्रस्ताव पाठवण्यात आला नाही. मी सरपंच पदासाठी उभं राहिलो तर सगळ्यांचे अर्ज रद्द करेन, असं सगळ्यांना वाटत होतं त्यामुळे त्यांनी माझं मतदार यादीतून नाव काढण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
केळीच्या चित्राचं बॅनर व्हायरल
यापूर्वी सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळी देखील बॅनर व्हायरल झाले होते. त्या बॅनरवर केळीचे चित्र काढण्यात आलं होतं. या बॅनरची देखील मोठी चर्चा झाली होती. सोशल मीडियावर बॅनर त्यावेळी व्हायरल झालं होतं. सगळीकडे केळ्याच्या चित्राची चर्चा सुरु होती. बॅनर नेमकं का लावण्यात आलं होतं आणि कोणासाठी लावण्यात आलं होतं. याचीही चांगलीच चर्चा रंगली होती.