(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गरिबीला कंटाळून नैराश्यात विष पिऊन विद्यार्थ्याची आत्महत्या
पांडुरंगने दहावीच्या परीक्षेत 85.60 टक्के गुण मिळविले असून गणित, इंग्रजी विषयात लक्षवेधी मार्क्स मिळविले आहेत.
सिंधुदुर्ग : राज्य माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला यात कोकण विभागाने बाजी मारली, त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यात बाजी मारली. जीवनात यशस्वी होण्यासाठी अपयशाने खचून न जाता सातत्यपूर्ण प्रामाणिक प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. मात्र, अभ्यासात हुशार असूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीतील शेर्ले राऊतवाडी येथील पांडुरंग प्रसाद राऊत या 16 वर्षीय शाळकरी विद्यार्थ्यांने 27 जूनला विष पिऊन केलेली आत्महत्या खूपच जिव्हारी लागली आहे. पांडुरंगने दहावीच्या परीक्षेत 85.60 टक्के गुण मिळविले असून गणित, इंग्रजी विषयात लक्षवेधी मार्क्स मिळविले आहेत.
शेर्ले येथील पांडुरंग राऊत या शाळकरी मुलाने 27 जून रोजी विष प्राशन केले होते. नातेवाइकांनी त्याला तातडीने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्याच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्याने अखेर बांबुळी गोवा येथे नेण्यात आले. आठ दिवस अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु असतानाच प्राणज्योत मालवली.
पांडुरंग हा अभ्यासात हुशार, प्रामाणिक व मेहनती मुलगा होता. जगदीश या टोपणनावाने तो गावात परिचित होता. मडूरा हायस्कूलमध्ये अभ्यासात हुशार अशी त्याची ओळख होती. घरच्या गरीबीमुळे मात्र तो कायम नैराश्यात असायचा. आपल्या कुटुंबाची गरीबी कधी संपणार ? असा प्रश्न तो घरच्या मंडळींकडे कायम उपस्थित करायचा. याच नैराश्यातून त्याने विष प्राशन केले व त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पांडुरंगच्या आईवडीलांसाठी हा मोठा धक्का होता. आपला मुलगा शिकून मोठा व्हावा, चांगल्या अधिकारी पदावर नोकरी करावी अशी त्यांची अपेक्षा होती. त्यासाठी ते अपार मेहनतही घेत होते. पांडुरंग अभ्यासात हुशार असल्याने त्याच्याकडून त्यांना मोठ्या अपेक्षाही होत्या. मात्र, ध्यानीमनी नसतानाही नैराश्येतून पांडुरंगने आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपविली. पांडुरंगला गणित विषयात 94, विज्ञान 91 तर इंग्रजी विषयात 84 मार्क्स आहेत. एकूण 85.60 टक्के गुण मिळवून तो दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला. मात्र, आईवडिलांच्या अपेक्षा अधांतरी ठेवत आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.