एक्स्प्लोर
Advertisement
अखेर दोन दिवसांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे
मुंबईत एसटीच्या मान्यताप्राप्त संघटना आणि दिवाकर रावते यांच्यात बैठक झाली. या बैठकीमध्ये सर्व मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
मुंबई : दोन दिवसांनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर एसटी कर्मचारी संघटनांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली.
मुंबईत एसटीच्या मान्यताप्राप्त संघटना आणि दिवाकर रावते यांच्यात बैठक झाली. या बैठकीमध्ये सर्व मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
दोन दिवस एसटी कर्मचाऱ्यांचा संप
एसटी कर्मचाऱ्यांनी 8 तारखेच्या मध्यरात्रीपासून अचानक कामबंद आंदोलन सुरु केलं. या काळात राज्यातील अनेक ठिकाणच्या बस डेपोमधून गाड्याच बाहेर निघाल्या नाहीत.
पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन होतं. अचानक काम बंद केल्याने सुट्टीवरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. अचानक काम बंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात एसटी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला.
राज्यभरात शेकडो कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं. एकट्या बीड जिल्ह्यात 121 जणांना सेवेतून तडकाफडकी निलंबित करण्यात आलं. तर यवतमाळ जिल्ह्यातील एकूण 9 आगारातील 46 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
नाशिक आगारातील काही जणांचं निलंबन मागेही घेण्यात आलं. पण मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, शिवशाही बस आणि शिवसेना प्रणित वाहतूक संघटनेकडून मात्र वाहतूक सुरु होती.
कर्मचाऱ्यांवरील कारवाईचं काय?
संपाच्या काळात अनेक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई मागे घेण्यात येईल, मात्र ज्यांनी गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले, त्यांच्याबाबत तडजोड केली जाणार नाही, असं दिवाकर रावतेंनी स्पष्ट केलं.
संपामुळे एसटीचं दोन दिवसात 33 कोटींचं नुकसान
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचं दोन दिवसात 33 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. एसटी संपाच्या दुसऱ्या दिवशी एसटीचा 18 कोटी रुपयांचा महसूल बुडाला, तर पहिल्या दिवशी 15 कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं.
दिवसभरात महाराष्ट्रातील 250 आगारातून सुमारे 20 टक्के बसच्या फेऱ्या सुटल्या. राज्यातील 25 आगार पूर्ण क्षमतेने चालू होते. तसेच 151 आगारामध्ये अंशतः वाहतूक सुरु होती.
राज्यातील 97 आगारातून दिवसभरात एकही बसची फेरी बाहेर पडली नाही. या संपाचे परिणाम मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, या जिल्ह्यात मोठया प्रमाणात जाणवत आहेत.
तुलनेने मराठवाडा आणि विदर्भामध्ये 40 टक्के वाहतूक सुरु होती. संध्याकाळी चार वाजेपर्यंत होणाऱ्या 32 हजार 148 बस फेऱ्यांपैकी सहा हजार 308 फेऱ्या सुरळीत सुरु होत्या.
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख 3 मागण्या :
एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा
पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी
जोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही, तोपर्यंत कर्मचारी, कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी
LIVE UPDATE :
09.35 PM दोन दिवसांनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक तोडगा
08.30 PM अहमदनगरला तारकपूर-कल्याण या शिवशाही बसवर दगडफेक, दगडफेकीत बसची काच फुटून अनिल वारे या चालकाच्या खांद्याला मार लागला
05.45 PM : एसटी महामंडळाचे व्यवस्थापक आणि कर्मचारी संघटनांमधली बैठक निष्फळ, बैठकीत संपाबाबात कुठलाही तोडगा नाही, कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी आणि दिवाकर रावते यांच्यात बैठक होणार
03.00 PM : मुंबई - एसटी संपावर तोडगा निघण्याची शक्यता, व्यवस्थापक रणजीतसिंग देओल यांनी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली
01.30 pM : रत्नागिरी – दापोलीहून मुंबईकडे येणाऱ्या शिवशाही बसवर अज्ञातांची दगडफेक, पिसई गावाजवळ घटना, गाडीच्या काचा फुटल्या, सुदैवाने जीवितहानी नाही
11.15 AM : पुण्यातील शिवाजीनगर बस स्थानकावर प्रवाशांचा खोळंबा, एसटीच्या संपामुळे खासगी वाहतूकदारांनी दर दुप्पट केल्याची प्रवाशांची तक्रार
11.00 : इंदापुरात दुसऱ्या दिवशीही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु, इंदापूर डेपोतील 65 गाड्यांपैकी फक्त तीनच गाड्यांच्या फेऱ्या सुरु
10.15 : यवतमाळ एसटी डेपोमधून सकाळी 8 पर्यंत 44 पैकी 24 बस सुटल्या, 20 फेऱ्या रद्द, अनेक कर्मचारी गैरहजर
9.15 AM - एसटी संपाचा कर्मचाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता, पगारवाढ रद्द करण्याचा प्रशासनाचा विचार सुरु, पगारवाढ करुनही संप करत असल्याने प्रशासन नाराज
8.13 AM - पालघर आणि बोईसर एसटी डेपोतून सकाळपासून एकही बस बाहेर पडली नाही, तर डहाणू आणि वाड्यामध्ये एसटी सेवा सुरळीत सुरु
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement