तुमच्या औकातीत राहून शब्द वापरा, शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचे दत्तात्रण भरणे यांना खडेबोल
तुम्ही तुमच्या औकातीत राहून शब्द वापरा. आमच्या शिवबंधनाची ताकद पाहायची असेल तर आम्ही एका क्षणात दाखवू. सोलापूरची बॉर्डर ओलांडू देणार नाही, असा इशारा तानाजी सावंत यांनी दिला.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एका कार्यक्रमात बोलण्याच्या ओघात एका कामाला निधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात 'मरुद्या मुख्यमंत्री' असं वक्तव्य केलं. दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. तुम्ही तुमच्या औकातीत राहून शब्द वापरा. आमच्या शिवबंधनाची ताकद पाहायची असेल तर आम्ही एका क्षणात दाखवू, असे खडे बोल सोलापूर व उस्मानाबाद शिवसेना संपर्क प्रमुख आमदार तानाजी सावंत यांनी भरणे यांना सुनावले आहेत.
तानाजी सावंत यांनी म्हटलं की, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक, आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक. ज्या मुख्यमंत्र्यांच्या जीवावर तुम्ही सत्तेमध्ये बसले आहात, त्यांच्याविषयी तुम्ही असं वक्तव्य करता. तुम्हाला जनतेने फेकून दिलं होतं, मात्र उद्धव साहेबांच्या आशीर्वादामुळे तुम्ही सत्तेत आहात. असं असातानाही मरुद्या मुख्यमंत्री अशी भाषा तुम्ही वापरता. तुम्ही तुमच्या औकातीत राहून शब्द वापरा. आमच्या शिवबंधनाची ताकद पाहायची असेल तर आम्ही एका क्षणात दाखवू. सोलापूरची बॉर्डर ओलांडू देणार नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश आहे, महाविकास आघाडीला तडा जाईल असं कोणतंही वक्तव्य करायचं नाही. या एका बंधनामध्ये राहून आम्ही मान घालून गप्प बसलो आहोत. याचा अर्थ तुम्ही आमच्या छाताडावर नाचावं, आमच्या पक्षप्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री यांच्याविषही अशी गलिच्छ भाषा वापरायची. याचं योग्यवेळी योग्य उत्तर दिलं जाईल, असा इशारा तानाजी सावंत यांनी दिलं आहे.
दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य आणि दिलगिरी
सोलापूर महानगरपालिकातर्फे आज माझी वसंधूरा अभियान अंतर्गत 20 हजार वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित नगरसेवकांनी या अभियानासाठी आणखी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. तेव्हा मनोगतावेळी पालकमंत्र्यांनी निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले. पालकमंत्री आपले मनोगत संपवत असताना सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर श्रीकांचना यन्नम दाखल झाल्या. त्यावेळी दत्तात्रय भऱणे यांनी त्यांना निधी उपलब्ध करुन द्यायचा का असा सवाल केला. तेव्हा महापौर यन्नम यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागुया असे उत्तर दिले. तेव्हा बोलण्याच्या ओघात भरणे यांनी 'मुख्यमंत्री मरु द्या. आपल्या आपण करु. मुख्यमंत्र्याकडून मोठा निधी मागू' असे वक्तव्य केले.
सोलापूरातील शिवसेनेच्या नेत्यांनी पालकमंत्र्यांवर जोरदार निशाला साधला. तेव्हा दत्तात्रय भरणे यांनी या बद्दल स्पष्टीकरण दिलं. उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांचे खूप चांगले काम आहे. माझ्या वक्तव्याचा पूर्णपणे विपर्यास करण्यात आला. तरी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.