'मरुद्या मुख्यमंत्री'... सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ओघात केलेल्या वक्तव्याची चर्चा, शिवसेनेच्या रोषानंतर दिलगिरी व्यक्त
माझ्या वक्तव्याचा पूर्णपणे विपर्यास करण्यात आला. तरी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एका कार्यक्रमात बोलण्याच्या ओघात केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. एका कामासंदर्भात निधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात 'मरुद्या मुख्यमंत्री' असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं. मात्र शिवसैनिकांचा रोष पाहता दत्तात्रय भरणे यांनी देखील तात्काळ दिलगिरी व्यक्त केली आहे.
सोलापूर महानगरपालिकातर्फे आज माझी वसंधूरा अभियान अंतर्गत 20 हजार वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित नगरसेवकांनी या अभियानासाठी आणखी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. तेव्हा मनोगतावेळी पालकमंत्र्यांनी निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले. पालकमंत्री आपले मनोगत संपवत असताना सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर श्रीकांचना यन्नम दाखल झाल्या. त्यावेळी दत्तात्रय भऱणे यांनी त्यांना निधी उपलब्ध करुन द्यायचा का असा सवाल केला. तेव्हा महापौर यन्नम यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागुया असे उत्तर दिले. तेव्हा बोलण्याच्या ओघात भरणे यांनी 'मुख्यमंत्री मरु द्या. आपल्या आपण करु. मुख्यमंत्र्याकडून मोठा निधी मागू' असे वक्तव्य केले. पालकमंत्र्यांनी ओघात केलेल्या वक्तव्याचे मात्र शिवसेनेकडून खरपूस समाचार घेतला जातोय.
सोलापूरातील शिवसेनेच्या नेत्यांनी पालकमंत्र्यांवर जोरदार निशाला साधला. तेव्हा दत्तात्रय भरणे यांनी या बद्दल स्पष्टीकरण दिलं. उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांचे खूप चांगले काम आहे. माझ्या वक्तव्याचा पूर्णपणे विपर्यास करण्यात आला. तरी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
'माझी वसुंधरा' अभियानांतर्गत एकाच दिवसात 20 हजार झाडांचं वृक्षारोपण
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील 'माझी वसुंधरा' या अभियानाअंतर्गत एकाच दिवसात तब्बल 20 हजार झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं आहे. सोलापुरातील केगांव- देगांव रोड येथे पालिकेच्या मोकळ्या 43 एकर जागेवर नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या भांडवली निधीतून वृक्षारोपणाचा कार्यक्रम पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत पार पडला. विशेष म्हणजे वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी या परिसरात असलेल्या विहिरीतून संपूर्ण परिसरात ठिबक सिंचन करण्यात आले आहे. तसेच परिसराची विभागणी करून त्याच्या देखभालीची जबाबदारी शहरातील एक एक उद्योजक घेणार आहे. त्यामुळे या परिसरात ऑक्सिजन पार्क निर्माण करण्याचा प्रयत्न पालिकेच्या वतीने केला जात आहे. या परिसरात पर्यटक यावेत म्हणून ग्रीन पार्क, रॉक गार्डन, नॅचरोपॅथी केंद्र येत्या काळात सोलापूरकरांसाठी उभं करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त तथा माझी वसुंधरा अभियानाचे नियंत्रक धनराज पांडे यांनी दिली.