(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिवसेनेकडून 2014 मध्येही काँग्रेसला सत्तेचा प्रस्ताव : पृथ्वीराज चव्हाण
2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार स्थापन केलं. परंतु 2019 मध्येच नाही तर 2014 च्या निवडणुकीनंतरही शिवसेनेने काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव दिल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
मुंबई : "2014 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसला सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला होता, मात्र तेव्हा काँग्रसने प्रस्ताव फेटाळला होता," असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी हा दावा केला. तसंच राज्यातलं सध्याचं सरकार पूर्ण कार्यकाळ पूर्ण करणार का, याबाबत पूर्ण हमी कोणीच देऊ शकणार नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर तसंच इंदिरा गांधी-करीम लाला यांच्या भेटीच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि शिवसेनेत शाब्दिक युद्ध सुरु असतानाच पृथ्वीराज चव्हाणांचा हा गौप्यस्फोट खबळब माजवणारा आहे.
वेगळी विचारधारा असूनही काँग्रेस आणि शिवसेना एकत्र कसे आले, असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांना पीटीआयच्या मुलाखतीत विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की, "2014 मध्येही अशीच परिस्थिती होती. तेव्हाही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी माझ्याशी संपर्क करुन आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता. तेव्हा मी तातडीने ती ऑफर नाकारली आणि राजकारणात जय-पराजय ही सामान्य गोष्ट असल्याचं म्हटलं होतं. आम्ही निवडणुकीत पराभूत झालो आणि विरोधी बाकांवर बसलो."
2014 च्या निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजपने 25 वर्षांची युती तोडली आणि स्वबळावर निवडणूक लढवली. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगवेगळी निवडणूक लढली होती. निकालानंतर भाजपने सत्ता स्थापन केली, मात्र त्यानंतर शिवसेना सत्तेत सहभागी झाली होती.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या काळात राज्यातील भ्रष्टाचारही वाढला, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ते म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे 2019 मध्ये शिवसेनेला पाठिंबा देऊन महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. यादरम्यान लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सुमारे 40 आमदार फोडले, सत्तेचा गैरवापर करुन लोकांना ब्लॅकमेल आणि आमिष देण्याचा प्रयत्न केला. एकूणच भाजपने लोकशाही संपवली असती."
"अशा परिस्थितीत आम्ही आमची भूमिका बदलली आणि पर्याय सरकारचा विचार केला. भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर मी पर्यायी सरकारसाठी पुढाकार घेतला आणि त्यादृष्टीने चर्चेला सुरुवात केली," असं चव्हाणांनी सांगितलं.
"सुरुवातीला शिवसेनेसोबत हातमिळवणी करण्याबाबत पक्षश्रेष्ठी तयार नव्हते. सोनिया गांधी आणि केरळमधील पक्षाच्या नेत्यांचा याला विरोध होता. पण मी सगळ्या आमदारांसोबत आणि इतर पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा केली. विचारधारेचा विचार करता भाजप आमचा सर्वात मोठा विरोधक आहे आणि पर्यायी सरकारबाबत सगळ्यांचं एकमत झालं होतं," असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. राज्यातलं सध्याचं सरकार कार्यकाळ पूर्ण करणार का, याबाबत विचारलं असता पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं की, आघाडी सरकारबाबत 100 टक्के हमी कोणीच देऊ शकत नाही. मात्र विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि शिवसेनेचा विश्वासघात करणाऱ्या भाजपविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत. समजूतदारपणे काम केल्यास कोणतीही अडचणी येणार नाही, असं पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं. मात्र दैनंदिन कामकाजात थोड्याफार अडचणी येणारच, असंही त्यांनी मान्य केलं. परंतु भाजप जुन्याच मुद्द्यांवर भर देत असल्याचं त्यांनी सांगितलं.राष्ट्रवादीकडे प्रस्ताव आला नव्हता : नवाब मलिक दुसरीकडे शिवसेनेने 2014 मध्ये राष्ट्रवादीला प्रस्ताव दिला नव्हता, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेनेची काँग्रेससोबत चर्चा झाली असावी, परंतु आमच्यासोबत नाही. आमच्याकडे असा कोणताही प्रस्ताव आला नव्हता, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.
शिवसेनेने प्रस्तावाचं वृत्त फेटाळलं! 2014 साली सत्ता स्थापनेबाबत काँग्रेससोबत चर्चा झाल्याचं वृत्त शिवसेनेने फेटाळलं आहे. "शिवसेनेने काँग्रेसला दिलेल्या प्रस्ताबाबत आम्हाला माहिती नाही. त्या बैठकीत कोण सहभागी होतं? अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
शिवसेना-काँग्रेसमध्ये धुसफूस 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापन केली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वेगवेगळ्या विचारधारेचे तीन पक्ष एकत्र आले महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. परंतु गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि इंदिरा गांधी-करीम लाला भेट या मुद्द्यांवरुन शिवसेना आणि काँग्रेसमधील धुसफूस समोर आली आहे. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांना भेटल्या होत्या, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीत केला होता. मात्र काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर राऊत यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं.