'नाणार'वरून शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप; जिल्हाप्रमुख आणि आमदारांमध्येच 'बोंबाबोंब'!
नाणारचं समर्थन करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांची हकलपट्टी देखील केली होती. त्यानंतर देखील काही शिवसैनिक हे 2 मार्च रोजी डोंगर तिठा येथे समर्थनाच्या सभेला गेले होते.
मुंबई : नाणारचा मुद्दा आता संपला असल्याचं शिवसेनेनं जाहीर केलं असलं तरी याच प्रकल्पावरून आता शिवसेनेतच ऐन शिमग्याच्या तोंडावर बोंबाबोंब सुरू झाली आहे. नाणार रिफायनरीवरून आता शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. नाणार रिफायनरीला शिवसेनेचा विरोध होता आणि आहे. शिवसेना स्थानिकांसोबत आहे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे पुत्र आहेत. ते कोणत्याही परिस्थितीत शब्द फिरवणार नाहीत. शिवाय, जो शिवसैनिक नाणार रिफायनरीचं समर्थन करताना दिसेल त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी 1 मार्च रोजी नाणार प्रकल्पाच्या विरोधात झालेल्या सभेत दिला होता. शिवाय, नाणारचं समर्थन करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांची हकलपट्टी देखील केली होती. त्यानंतर देखील काही शिवसैनिक हे 2 मार्च रोजी डोंगर तिठा येथे समर्थनाच्या सभेला गेले होते. त्यांच्यावर आता कारवाई होणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख सुधिर मोरे यांनी दिली आहे. त्यानंतर आता जिल्हाप्रमुख विलास चाळके आणि राजापूर - लांजा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांच्यातील वाद देखील चव्हाट्यावर आला आहे. या साऱ्या प्रकरणाची दखल आता शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे.
काय आहे जिल्हा प्रमुख, आमदारांमधील वाद? रिफायनरीबाबत आमदार राजन साळवी यांनी भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान जिल्हा प्रमुख विलास चाळके यांनी दिलं होतं. त्यांला आता आमदार राजन साळवी यांनी '10 वर्षे काँग्रेसमध्ये असणाऱ्या जिल्हा प्रमुखांनी फुकटचे सल्ले देऊ नयेत' असं प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, राजन साळवी यांच्या या वक्तव्याची दखल आता शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे. याप्रकरणी आमदार राजन साळवी यांना जाब विचारला जाईल अशी माहिती जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांनी दिली आहे.
भाजप नेत्याचं 'ते' विधान आणि साळवींच्या भूमिकेवर शंका? दरम्यान, डोंगर तिठा येथे झालेल्या नाणार समर्थकांच्या जाहीर सभेत भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी राजन साळवी यांचा या प्रकल्पाला पाठिंबा आहे. त्यांचे हात सध्या दगडाखाली आहेत. योग्य वेळी ते समोर येतील आणि आपली भूमिका जाहीर करतील, असा गौप्यस्फोट केला होता. शिवाय, नाणारमध्ये ठाकरे आणि त्यांच्या नातेवाईकांच्या जमिनी असल्याचं खळबळजन विधान देखील जाहीर सभेत केलं होतं. सध्या प्रकल्पाचं समर्थन करणारे शिवसेनेचे सागवे जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी देखील राजन साळवी गटातील ओळखले जातात. त्यामुळे राजन साळवींची या साऱ्याला फूस असल्याची चर्चा रत्नागिरीतील राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Nanar Refinery Project | 'नाणार' प्रकल्पासाठी रत्नागिरीत सत्यनारायण पूजा, 'रिफायनरी येऊ दे रे', समर्थकांचं देवाला साकडं
नाणार समर्थनाच्या सभेला शिवसैनिक नेमके किती होते? राजापुरातील डोंगर तिठा येथे 2 मार्च रोजी नाणार रिफायनरी समर्थकांनी जाहीर सभा घेतली. यावेळी सत्यनारायण पुजेचं देखील आयोजन करण्यात आलं.होतं. यावेळी काही शिवसैनिकांनी सभेला हजेरी देखील लावली होती. पण, खरंच यावेळी पदाधिकाऱ्यांशिवाय शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर होते का? अशी देखील शंकाच आहे. कारण, सभेला आलेल्या अनेक लोकांना नेमकं कशासाठी आलो आहोत याची कल्पना नव्हती. शिवाय, येथे काही तरूण हे भाजप आणि शिवसेनेचा गमजा सर्वांनाच वाटताना दिसले. तर, काही महिलांनी आम्ही बचत गटाकडून आलो आहोत. बघु काय आहे. काहींनी तर आम्ही सत्यनारायणाच्या पुजेला आलो आहोत अशी प्रतिक्रिया 'एबीपी माझा'कडे दिली.तर, सभेला आलेल्या तरूणांना देखील आपण नेमके कशासाठी आला आहोत हेच माहित नव्हतं. शिवाय, सभेला काही नेपाळी ( गुरखे ) देखील हजर असल्याचं चित्र दिसून आलं.
संबंधित बातम्या :
Nanar Refinery | नाणार रिफायनरीवरुन कोकणात शिमगा, समर्थकांची आज बैठक
शिवसेनेनं रद्द केलेल्या नाणार रिफायनरीसाठी समर्थकांची सभा; समर्थक शिवसैनिक देखील राहणार हजर?