(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाणारवरून आता महाविकासआघाडीत बिघाडी? राष्ट्रवादीचे नेते म्हणतात 'आम्हाला विचारल्याशिवाय भूमिका ठरवू नका'!
नाणार आणि आयलॉग सारख्या प्रकल्पांबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी नाणार येथे 1 मार्च रोजी शिवसेना जाहीर सभा घेणार आहे. या सभेला खासदार, आमदार, जिल्हासंपर्क प्रमुख, तालुकाप्रमुखांसह इतर नेते देखील हजर राहणार आहेत.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार प्रकल्पावरून आता कोकणात शिमग्यापूर्वीच बोंबाबोंब सुरू झाली आहे. त्यात आता रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची आणि महाविकासआघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेचा नाणारला विरोध कायम आहे, अशी जाहीर भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातल्या पहिल्या दौऱ्यात सिंधुदुर्गातील पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. पण, आता रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेसनं पत्रकार परिषद घेत नाणार आणि आयलॉगसारखे प्रकल्प झाले पाहिजेत अशी भूमिका घेतली आहे. कोकणातल्या रोजगार निर्मितीसाठी नाणार, आयलॉग सारखे प्रकल्प आले पाहिजेत. अशी भूमिका रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतली आहे. गुरूवारी संध्याकाळी झालेल्या या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आणि माजी नगरसेवक निलिंद किर आणि माजी नगराध्यक्ष आणि जिल्हा सरचिटणीस कुमार शेट्ये हजर होते. प्रकल्पांबाबत 'आम्हाला विचारल्याशिवाय पक्ष श्रेष्ठींनी भूमिका ठरवू नये' असं विधान कुमार शेट्ये यांनी केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय तरी काय? असा सवाल देखील विचारला जात आहे. ज्या राजापूर तालुक्यात हे दोन्ही प्रकल्प येणार आहेत त्याठिकाणचा एकही नेता अथवा पदाधिकारी या बैठकीला हजर नव्हते. शिवाय, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबजी जाधव यांना देखील याबाबतची कल्पना नव्हती. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संवादाचा अभाव, गटातटाचं राजकारण का नाणारबाबत नवं राजकारण केलं जात आहे? असा सवाल देखील आता निर्माण झाला आहे.
उदय सामंत यांच्यावर निशणा
यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यावर 'प्रकल्प रायगडमध्ये जावेत यासाठी सुपारी घेतली काय?' अशा शब्दात टीका केली. शिवाय, सिंधुदुर्गचे पालकमंत्री असताना आणि रत्नागिरीचे आमदार असताना नाणार प्रकल्पात सामंत लुडबुड करत असल्याचा आरोप देखील करण्यात आला.
#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन | नाणार प्रकल्प आणायचा असेल तर स्थानिकांचा विचार गरजेचा : सुभाष देसाई
संवादाचा अभाव की राजकारण?
दरम्यान, मी मुंबईला होतो. मला या पत्रकार परिषदेबाबत काहीही माहिती नाही. पण, स्थानिकांची भूमिका ती आमची भूमिका आहे. पक्षाचे वरिष्ठ याबाबत निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली. त्यामुळे रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय तरी काय? हा देखील प्रश्न आहे. शिवाय, नाणार प्रकल्पावरून नवं राजकारण करण्यासाठी तर ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली नव्हती ना? अशी शंका देखील रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेसची गोंधळलेली भूमिका पाहता देखील येते. तर, आम्हाला प्रदुषण विरहीत प्रकल्प हवेत अशी मागणी देखील दुसऱ्या बाजुला रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेसचे हे नेते करताना दिसत आहेत. परिणामी त्यांना नेमकं हवं तरी काय? हा देखील मोठा प्रश्न आहे.
प्रकल्पाला 8 हजार एकर जमीन मालकांची परवानगी?
नाणार प्रकल्पाकरता आता समर्थक एकवटले आहेत. यावेळ समर्थकांकडून आमच्याकडे 8 हजार एकर जमीन मालकांची परवानगी असल्याचा दावा केला जात आहे. त्याकरता जमीन मालकांचं अॅफिडेव्हीट देखील दाखवलं जात आहे. पण, कोकणातल्या सातबाराची परिस्थिती आणि त्यावर असलेली नावं पाहता खरंच 8 हजार एकर जमीन मालक परवानगी द्यायला तयार आहेत का? शिवाय, घरातील अथवा सातबारावरील एका जमीन मालकानं दिलेल्या परवानगीचा अर्थ सर्वांची परवानगी असा होतो का? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहतो.
पाहा व्हिडीओ : नाणार प्रकल्पावरुन शिवसैनिकांमध्ये फुट? शिवसेना 1 मार्चला भूमिका स्पष्ट करणार
छत्रपती शिवाजी महाराज ग्रीन रिफायनरी
आता नाणार रिफायनरी प्रकल्पामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण सुरू झालं आहे का? असा सवाल देखील केला जात आहे. कारण, रत्नागिरी रिफायनरी नाही तर, छत्रपती शिवाजी महाराज ग्रीन रिफायनरीचे मी जमिन मालक स्वागत करतो असे फलक समर्थकांनी झळकवले आहेत. त्यामुळे भावनिक मुद्याला हात घालण्याचं आणि महाराजांच्या नावाचा उल्लेख नेमका कशासाठी? हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे.
शिवसेनेची 1 मार्च रोजी सभा
नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेवर सध्या जोरदार टीका सुरू आहे. काही स्थानिक शिवसेना नेते आणि पदाधिकारी देखील समर्थन करताना दिसत आहेत. त्यावरून सध्या सेनेतच दोन गट दिसू लागले आहेत. त्यामुळे आता नाणार आणि आयलॉग सारख्या प्रकल्पांबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी नाणार येथे 1 मार्च रोजी शिवसेना जाहीर सभा घेणार आहे. या सभेला खासदार, आमदार, जिल्हासंपर्क प्रमुख, तालुकाप्रमुखांसह इतर नेते देखील हजर राहणार आहेत.
संबंधित बातम्या :
नाणार रिफायनरीविरोधातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
रत्नागिरीत नाणार ऑईल रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ मोर्चा, भाजपचा पाठिंबा
नाणार प्रकल्प रद्द का करत नाही?, राणेंच्या प्रश्नावर देसाई म्हणाले...