साताऱ्यात कोरोनाच्या भीतीने गल्लीबोळातील डॉक्टर गायब, दवाखाने तात्काळ उघडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
साताऱ्यात खाजगी दवाखाने सुरु करुन परिसरात प्रॅक्टिस करणाऱ्या जवळपास सर्वच डॉक्टरांनी कोरोनाच्या भीतीने आपले दवाखाने बंद केले आहेत. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयांवर याचा ताण पडताना दिसत आहे.
सातारा : एकीकडे आपल्या जीवाची बाजी लावत रात्रंदिवस कर्जव्य बजावणाऱ्या डॉक्टरांचं कौतुक होत आहे. तर दुसरीकडे कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे साताऱ्यातील गल्लीबोळातील अनेक खाजगी दवाखान्यातील डॉक्टर आपले दवाखाने बंद करून गायब झाल्याचं समोर आलं आहे. खाजगी ओपीडी सुरु करुन परिसरात प्रॅक्टिस करणाऱ्या जवळपास सर्वच डॉक्टरांनी कोरोनाच्या भीतीने आपले दवाखाने बंद केले आहेत. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयांवर याचा ताण पडताना दिसत आहे.
साधारण उपचारासाठी नागरिक आपल्या परिसरातील डॉक्टरांकडे उपचार घेतात. मात्र साताऱ्यात स्थानिक पातळीवर डॉक्टर उपस्थित नसल्याने नागरिकांना जिल्हा शासकीय रुग्णालयांशिवाय पर्याय उपलब्ध नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून सर्व डॉक्टरांना त्यांचे स्वत:चे खाजगी दवाखाने खुले करण्याचे आदेश दिले आहेत.
दवाखाना सुरु केल्यावर त्या ठिकाणी कोरोनाची लक्षण दिसणाऱ्या रुग्णांसाठी वेगळे बेड तयार करावे. सॅनिटायझरच्या बॉटल दवाखान्यात ठेवाव्या, दवाखाना स्वच्छ ठेवावा, लहान मुले आणि वृद्धांवर प्रथम उपचार करावेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशांमुळे आता गल्ली-बोळातली गायब झालेले डॉक्टर्स हजर होतात हे लवकरच स्पष्ट होईल.
संबंधित बातम्या :- VIDEO | 'पप्पा, जाऊ नका, बाहेर कोरोना आहे' ड्युटीवर चाललेल्या पोलीस पित्याला चिमुकल्याची आर्त साद
- सरकारी रुग्णालयात मास्कचा तुटवडा; एक मास्क चार दिवस वापरण्याची डॉक्टरांवर नामुश्की
- Coronavirus | मास्क, हँड सॅनिटायझरच्या किमती केंद्र सरकारकडून निश्चित
- Coronavirus | कोरोना बाधितांना वाचवण्यासाठी महाराष्ट्रात पुरेशी व्हेंटिलेटर्स आहेत का?