Nanded : भाजपला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकर लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
नांदेड जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकर लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, अशोक चव्हाणांकडून निर्णयाचं स्वागत.
नांदेड : माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी भाजपाला अखेरचा राम राम करत पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतलाय. आज माजी मंत्री, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी भाजपासोबत केलेला सात वर्षांचा संसार मोडत पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. भास्करराव पाटील खतगावकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून भाजपात आपली घुसमट होत असल्याने आपण आपल्या कार्यकर्त्यांसह पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे यावेळी सांगितले.
भारताचे माजी गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या राजकीय तालमीमध्ये माझी जडणघडण झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक पदांवर काम करून लोकांना न्याय देण्याची संधी मला मिळाली. देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातून जनतेच्या आशीर्वादाने मी तीन वेळा विजयी झालो. त्यासोबतच लोकसभेतही तीन वेळा प्रतिनिधीत्व करण्याची संधी मला जनतेने दिली होती.पण भाजपात गेल्यानंतर माझी मतं विचारात घेतली गेली नाही. तसेच खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या एकाधिकार शाहीमुळे मी भाजप सोडत असल्याचे त्यांनी सांगितलं.
भास्करराव पाटील खतगावकर यांच्या जाण्याने नांदेड जिल्ह्यात भाजपला मोठे खिंडार पडलं आहे. भास्कराव पाटील यांच्या भाजपाला सोडचिट्ठीमुळे देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वी भाजपातील दुफळी मात्र उघड झालीय. भास्करराव पाटील खतगावकर यांनी भाजपातून राजीनामा दिल्यानंतर आपण लगेच काँग्रेस पक्षात प्रवेश करून राजकारणात सक्रिय होणार असल्याचं जाहीर केलं आहे. यावेळी माजी मंत्री भास्कराव पाटील खतगावकर सह,माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह भारतीय जनता पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिलीय. तर देगलूर पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश रावसाहेब अंतापूरकर निश्चितपणे विजयी होणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली आहे.
भाजपातील नाराजांना जसे काँग्रेस जवळ करत पक्ष प्रवेश करण्याची घोषणा केलीय, त्याच पद्धतीने काँग्रेसमधील नाराजांनीसुद्धा आपली नाराजी व्यक्त केलीय. कारण काँग्रेसचे कार्यकर्ते तथा उद्योजक भीमराव क्षिरसागर यांनी देगलूर -बिलोली उमेदवार निवड प्रकरणी आपल्यावर काँगेस पक्षाने अन्याय केल्याचे बोलून दाखवलय. भाजपा, काँग्रेस पक्षातील नाराजांच्या या गटामुळे देगलूर बिलोली निवडणुकीत नेमका कुणाला फायदा होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.