Mrityunjay Doot: महामार्गांवरील अपघातग्रस्तांच्या मदतीला धावणार 'हायवे मृत्युंजय दूत'
गेल्या वर्षभरात राज्यातील महामार्गावर 11 हजार 452 प्रवाशांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. यामुळे, अनेक कुटुंबांवर शोककळा पसरली.
रायगड : राज्यात रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूची संख्या कमी करणे आणि जखमी प्रवाशांना वेळेत उपचार मिळावे यासाठी राज्य सरकार मार्फत 'हायवे मृत्युंजय दूत' योजना राबविण्यात येणार आहे. यामुळे, अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळून जीवनदान देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षभरात राज्यातील महामार्गावर 11 हजार 452 प्रवाशांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. यामुळे, अनेक कुटुंबांवर शोककळा पसरली. महामार्गांर होणाऱ्या अपघातांना नियंत्रणात आणण्यासाठी आजवर अनेक पावलंही उचलण्यात आली. त्यातच आता अपघातात जखमी होणाऱ्या प्रवाशांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी राज्य शासनाने राज्यभरातील महामार्गांवर ' हायवे मृत्युंजय दूत' योजना राबविण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.
मुंबई - पुणे Express Way वरील बोरघाट बनतोय 'डेंजर झोन'
मुंबई आणि पुणे दरम्यानच्या द्रुतगती महामार्गावर दररोज अपघात होत असल्याने या मार्गावरदेखील ही योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील पळस्पे, बोरघाट, खंडाळा आणि कामशेत या ठिकाणी असलेल्या वाहतूक पोलिसांमार्फत स्थानिक गावकरी, समाजसेवक, डॉक्टर, यांच्या साहाय्याने काही गट तयार करण्यात येणार असून, अपघातप्रसंगी त्यांची मदत घेण्यात येणार आहे.
सदर गट तयार करण्यात आल्यानंतर अपघाताच्या घटनास्थळापासून जवळ असलेले 'हायवे मृत्युंजय दूत' हे तातडीने मदत पोहचवू शकणार आहेत. तर, या मोहिमेतील स्थानिक गावकरी आणि मदतगारांना अपघातग्रस्तांना देण्यात येणाऱ्या प्राथमिक उपचाराचे प्रशिक्षणही देण्यात येणार असल्यामुळे त्यांचे प्राण वाचवणे शक्य होणार आहे. महामार्गावरील या मृत्युंजय दूत असणाऱ्या व्यक्तींना 'फर्स्ट - एड' किट आणि स्ट्रेचर देखील देण्यात येणार आहेत. यामुळे, राज्य सरकारच्या या मोहिमेमुळे राज्यातील महामार्गावर होणाऱ्या अपघातातील मृत्यूचे प्रमाण देखील कमी करण्यात मोठी मदत मिळणार आहे.