Health Department: आरोग्य विभागाच्या परीक्षेचे एकाच दिवशी दोन पेपर वेगवेगळ्या जिल्ह्यात! विद्यार्थ्यांचा संताप
एकाच दिवशी दोन पेपर्स, तेही वेगवेगळ्या शहरात कसे देता येणार असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. त्यातून आरोग्य विभागाचा (Health Department) भोंगळ कारभार पुन्हा समोर आला आहे.
मुंबई : मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती आणि इतरही अनेक कारणांमुळे रखडलेली आरोग्य विभागाची परीक्षा येत्या 28 फेब्रुवारीला होत आहे. पण एकाच दिवशी दोन पेपर, तेही वेगवेगळ्या शहरात कसे द्यायचे असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर पडला आहे. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना दोन पेपर्ससाठी 500 किमी चे अंतरही आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमुळे नाराजी दिसत आहे.
आरोग्य विभागाची परीक्षा राज्यात एकाच वेळी 28 फेब्रुवारीला होणार आहे. रविवारी सकाळी या परीक्षांचे हॉल तिकीट आले. मुलांनी परीक्षांसाठी जे सेंटर दिले होते ते त्यांना न देता 500 किमी दूर त्यांना परीक्षा सेंटर देण्यात आली आहेत. 28 फेब्रुवारीला दोन शिफ्ट मध्ये दोन वेगवेगळे पेपर घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांचा एक पेपर एका जिल्ह्यात आणि काहीच वेळानंतर होणारा दुसरा पेपर दुसऱ्याच जिल्ह्यात आहे. त्यामुळे दोन्ही पेपरला पोहोचणे अनेकांना शक्य नाही.
या परीक्षेसाठी जवळपास तीन लाख विद्यार्थी बसले आहेत. अनेक वर्षे रखडलेली आरोग्य विभागाची ही परीक्षा घेण्यात येत आहेत. एबीपी माझाला दिलेल्या दीर्घ मुलाखतीत राजेश टोपे यांनी ही परिक्षा घेत आहोत असे जानेवारी महिन्यात घोषित केलं होतं. आज परीक्षेसाठी प्रवेश पत्र आल्यानंतर परीक्षा कोणत्या-कोणत्या केंद्रावर होणार आहेत ते स्पष्ट झालं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असल्याचं दिसून येतंय. दुसरीकडे कोरोनाचा प्रभाव वाढत असताना परीक्षा न थांबवण्याचं सरकारचं धोरण दिसते आहे.
Rajesh Tope | आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण
राज्य सरकारच्या वतीनं 2019 मध्ये आरोग्य विभागाची जाहिरात काढण्यात आली. या जाहिरातीमध्ये 52 केंद्रासाठी विद्यार्थी अर्ज करु शकतात असं सांगण्यात आलं होतं. काही विद्यार्थ्यांनी आपापल्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केला. परंतु मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्य सरकारने अशा विद्यार्थ्यांना कॅटेगरी बदलण्याची मुभा दिली. काही विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस प्रवर्गातून अर्ज केला परंतु राज्य सरकारने कंपल्सरी अशा विद्यार्थ्यांना दोनच पदांसाठी परीक्षा देण्यासाठी हॉल तिकीट वितरीत केले. एखादा विद्यार्थी सकाळी मुंबईला परीक्षा देत असेल तर त्याच विद्यार्थ्याला औरंगाबाद मध्ये दुपारी दुसऱ्या पदासाठी परीक्षा द्यावी लागेल.
विद्यार्थी ठरवतील त्यांना कुठली परीक्षा द्यायची? कुठल्या पदावर बसायचं? कुठल्या जिल्ह्यात परीक्षा द्यायची? राज्य सरकार कसं काय मनाप्रमाणे लकी ड्रॉ सारखे दोन विषय निवडेल? राज्य सरकार या विद्यार्थ्यांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी एका तासामध्ये कुठलीही यंत्रणा उपलब्ध करुन देईल का त्याचा खुलासा करावा अशी मागणी विद्यार्थ्यांमध्ये होत आहे. सरकारने तात्काळ विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याप्रमाणे सर्व हॉल तिकीट वितरीत करावे व विद्यार्थिनी निवडलेल्या प्राधान्याच्या जिल्ह्यामध्येच सेंटर द्यावे. अगोदरच विद्यार्थी खचलेला आहे. पुन्हा अशा गोष्टींमुळे तो अजून अडचणीत येईल, याकरिता राज्य सरकारने तात्काळ निर्णय बदलावा अशीही मागणी करण्यात येत आहे.
पहा व्हिडीओ : "आरोग्य विभागाच्या नोकरभरती परीक्षेत केद्रांचा घोळ, राज्य सरकारकडून अन्याय" - विनोद पाटील
[/quote]