मराठवाड्यातील या जिल्ह्यांत पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यांसह पाऊस, प्रादेशिक हवामान केंद्राचा अंदाज
Marathwada weather: प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील तीन दिवसांसाठी मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यांना मुसळधार तर कोणत्या जिल्ह्यांना हलक्या सरींचा पाऊस होणार याचा अंदाज वर्तवला आहे.
राज्यभरात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली असून मध्य महाराष्ट्र व कोकणात मुसळधार पाऊस झाला. दरम्यान , पुढील तीन दिवस मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे.
उद्यापासून 16 जुलैपर्यंत मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता असून बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना पुढील तीन दिवस पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.
कोणत्या जिल्ह्यांत कसा राहणार पाऊस?
दरम्यान प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार उद्या छत्रपती संभाजीनगर, जालना , धाराशिव , नांदेड जिल्ह्यासह बीड परभणी व हिंगोलीमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.यावेळी वाऱ्याचा वेग 30 ते 40 किलोमीटर प्रतितास राहणार असून ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज काय?
14 जुलै-
बीड, परभणी, हिंगोलीत मुसळधार पावसाची शक्यता राहणार असून छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, नांदेड, जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
15 जुलै -
लातूर, धाराशिव, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून ढगांच्या कडकडाटासह विजांचा कडकडाटही राहण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे.
16 जुलै -
छत्रपती संभाजीनगर, जालना व परभणीत मुसळधार पाऊस राहणार असून हिंगोली, बीड, धाराशिव, नांदेड, लातूर विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
आयएमडीने दिला सर्व विभागात यलो अलर्ट
भारतीय हवामान केंद्राने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना पुढील तीन दिवस यलो अलर्ट दिला असून बहुतांश भागात पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, मराठवाड्यात ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून विभागनिहाय तसेच जिल्हानिहाय पावसाचा प्रादेशिक हवामान केंद्राने अंदाज दिला आहे.
राजधानीत पाणीच पाणी
राजधानी मुंबईसह उपनगरात आणि परिसरातील जिल्ह्यात पहाटेपासूनच पावसाने (Rain) दमदार हजेरी लावल्याने जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. मुंबईसह (Mumbai) ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई जिल्ह्यातही पावसामुळे नदी, नाले, बंधारे भरुन वाहत आहेत.
रस्त्यावर पाणीच पाणी, जनजीवन विस्कळीत
मुंबई शहरासह उपनगरात आज सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावल्यान जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झालं असून पाण्यातून मार्ग काढत वाहने व नागरिक प्रवास करतानाचे चित्र दिसत आहे. मुंबईसह उपनगर आणि कोकणताही मुसळधार वर्षाव सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये रुग्णालयात पाणीच पाणी झालंय.
हेही वाचा:
मुंबईसह कोकणातही मुसळधार, अकोल्यात दोघे बुडाले; कुठं रेड अलर्ट, कुठ पूरस्थिती, पावसाची संपूर्ण अपडेट