बुलेट ट्रेन आमचं स्वप्न नाही, तो पांढरा हत्ती, त्याला पोसणं गरजेचं नाही : मुख्यमंत्री
'आताच्या आता काय तातडीने गरजेचे आहे. नुसतं आपल्याला कोण बिनव्याजी म्हणा किंवा कमी दराने कर्ज देतोय म्हणून ते अंगावरती घ्यायचं आणि गरज नसताना शेतकऱ्यांच्या जमिनी पण काढायच्या, पुन्हा हे जे पांढरे हत्ती आहेत ते सुद्धा पोसायचे, हे काही योग्य नाही', असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुलाखतीत बोलताना म्हणाले.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना बुलेट ट्रेनला ब्रेक लावण्याचे संकेत दिले आहेत. 'बुलेट ट्रेन आमचं स्वप्न नाही. राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करत 'बुलेट ट्रेन' प्रकल्प किती उपयोगाचा आहे हे पटवून द्या, आपण जनतेसमोर जाऊ. मग पाहू काय करायचे ते' , असं मुख्यमंत्री म्हणाले. तसेच संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत जीएसटीवरुन केंद्रावर निशाणा साधला आहे. याशिवाय सातबारा कोरा करण्याबद्दलही त्यांनी भाष्य केलं आहे.
राज्याच्या विकासाची प्राथमिकता ठरवणं गरजेचं
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, 'सरकारचं काम विकास करणं आहे. अलीकडेच मी मंत्रालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलं. कामे सुरू आहेत हेही खरं आहे की, काही प्रकल्पांना मी स्थगिती दिली आहे. जरूर दिली आहे. मला नेहमी असं वाटतं की, पैशाचा जो मघाशी विषय निघाला त्या आर्थिक परिस्थितीकडे बघून राज्याच्या विकासाची प्राथमिकता ठरवली पाहिजे. आताच्या आता काय तातडीने गरजेचे आहे. नुसतं आपल्याला कोण बिनव्याजी म्हणा किंवा कमी दराने कर्ज देतोय म्हणून ते अंगावरती घ्यायचं आणि गरज नसताना शेतकऱ्यांच्या जमिनी पण काढायच्या, पुन्हा हे जे पांढरे हत्ती आहेत ते सुद्धा पोसायचे, हे काही योग्य नाही'
पाहा व्हिडीओ : मातोश्री ते मंत्रालय प्रवास, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रोखठोक मुलाखत
जे प्रकल्प पांढऱ्या हत्तीसारखे नंतर समोर आले, त्यांना स्थगिती दिली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना बुलेट ट्रेन महाराष्ट्रात येणार की नाही? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, 'बुलेट ट्रेनचा उपयोग कोणाला होणार आहे, त्याच्यामुळे इथे किती उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे आणि तो जर उपयोगाचा असेल. तर पटवून द्या' असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. सरकार स्थापन होण्याआधी जे पाच वर्षे सरकार होतं त्यांनी अनेक असे प्रकल्प निर्माण केले, मंजूर केले, उभे केले, जे पांढऱ्या हत्तीसारखे नंतर समोर आले आणि आपण त्यांना स्थगिती दिली. त्यातला एक बुलेट ट्रेनचा प्रकल्प आहे.'
कर्जमाफी हा प्रथमोपचार
शेतकरी कर्जमाफीवरुन विरोधक महाविकास आघाडी सरकारवर टीका करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत आपली भूमिका मांडली आले. कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. कर्जमाफी हा प्रथमोपचार आहे. मी हे नेहमीच सांगत आलो आहे. जो आता आपण करतो आहोत. मात्र शेतकरी त्याच्या पायावर उभा कसा राहील असा आपला प्रयत्न असला पाहिजे. त्यासाठी शेतीमध्ये नवीन प्रयोग कसे करता येतील, कमी जागेत जास्त पीक कसं घेता येईल, ते पीक आल्यानंतर त्याला योग्य भाव कसा मिळवून दिला जाईल, मग त्याचं मार्केटिंग कसं केलं जाईल ही संपूर्ण चेन असायला हवी, त्याची आखणी केली गेली पाहिजे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. सामना वृत्तपत्रासाठी संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे बोलत होते.
दोन लाखांपर्यंत कर्ज माफ होणार
दोन महिन्यांनंतर आपली कर्जमुक्ती होईल याची त्यांना खात्री आणि विश्वास आहे. मी शब्द दिल्याप्रमाणे मार्चमध्ये ही योजना सुरु होईल. दोन लाखांपर्यंत ज्याचं पीक कर्ज आहे, ते पूर्ण माफ होणार आहे. म्हणजे त्याचा दोन लाखांपर्यंतच्या पीक कर्जाचा सातबारा आहे त्यावरून त्याचं पीक कर्ज काढलं जाणार आहे. दोन लाखांच्या वरचे जे कर्जदार आहेत किंवा कर्ज ज्यांनी घेतलेलं आहे, त्यांच्यासाठी आणि जे नियमित कर्ज परतफेड करताहेत त्यांच्यासाठीसुद्धा आपण योजना लवकरच जाहीर करुन ती अमलात आणू, असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं.
संबंधित बातम्या :
पाहा व्हिडीओ : रेडिरेकनर दर कपातीमुळे मुंबईतली घरं स्वस्त होणार
कर्जमाफी शेतकऱ्यांचा हक्क, दोन लाखांवरची कर्जमुक्ती करण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार की विधानपरिषदेवर जाणार?