Dhule Crime : अवैध गुटखा व्यावसायिकांचा सुळसुळाट, धुळे पोलिसांकडून 31 लाखांची कारवाई
Dhule Crime : धुळे तालुका पोलिसांनी (Dhule Taluka Police) 31 लाख रुपये किमतीचा गुटख्यासह गांजा जप्त केला आहे.
Dhule Crime : इंदोर येथून नाशिककडे (Nashik) जाणारा सुमारे 26 लाख 31 हजार पाचशे रुपये किमतीचा रजनीगंधा, पान मसाला गुटखा (Gutkha) आणि तंबाखू धुळे तालुका पोलिसांनी (Dhule Taluka Police) जप्त केला आहे, तर दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी पाच लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. त्यामुळे मागील वीस दिवसांत धुळे तालुक्यात तिसरी कारवाई झाली आहे. तर अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
धुळे तालुका परीसरातील अवैध गुटखा प्रकरणे निदर्शनास येत आहेत. धुळे तालुका पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे इंदोर येथून नाशिककडे जाणारा रजनीगंधा पानमसाला गुटखा आणि तुलसी तंबाखूचे एकूण बारा पार्सल अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने आर्वी येथे सापळा रचून सुमारे 26 लाख 31 हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेश (MP) राज्यातून महाराष्ट्रात गुटख्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असून पोलिसांकडून होणाऱ्या कारवायांमध्ये देखील वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या कारवाईत 13 लाख 99 हजार 680 रुपये किमतीचा रजनीगंधा पान मसाला एक लाख 55 हजार रुपये किमतीचा रजनीगंधा पान मसाला गुटख्याच्या पांढऱ्या गोणीचे पार्सल, तीन लाख 76 हजार 320 रुपये किमतीची तुलसी तंबाखू असलेल्या दोन गोण्या, आणि सात हजार रुपये किमतीचे आयशर वाहन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच धुळे तालुक्यातील मांडळ शिवारात गांजाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर तालुका पोलिसांच्या पथकाने कारवाई करत त्याच्या शेतातील पाच लाख 970 रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे याप्रकरणी एका झाडाला ताब्यात घेण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वीच लाखोंचा गुटखा जप्त
धुळे शहरातील आर्वी शिवारातून तालुका पोलिसांनी (Dhule Police) सुमारे नऊ लाख 93 हजार 180 रुपये किमतीचा अफू (Opium) जप्त केला आहे. या कारवाईत वाहनांसह तब्बल 17 लाख 93 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना घडली होती. तर त्याआधी देवपूर भागात असलेल्या विट भट्टी परिसरात तीन लाख रुपये किमतीचा सुगंधित पान मसाला व गुटखा हा जप्त करण्यात आला होता. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे आता अवैध्य गुटखा तस्करी करणारे आणि विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.