Coronavirus: लसीकरणाचा वेग मंदावल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागेल, तज्ज्ञांचा इशारा
पुरेसा लसीचा साठा उपलब्ध नसल्याने राज्यात 1 मे पासून 18 वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात होणार नाही.राज्यातील लसीकरणाचा वेग मंदावल्यास कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
मुंबई: देशभरात कोरोनाच्या आलेल्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे देशातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. अशातच राज्याला पुरेशा लसीचा पुरवठा होत नसल्याने 1 मे पासून होणाऱ्या व्यापक लसीकरणाच्या मोहिमेमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. राज्यातील लसीकरणाचा वेग मंदावल्यास राज्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागेल असा इशारा काही तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे राज्यासमोरील चिंतेत वाढ झाली आहे.
राज्यात 1 मे पासून 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार होते. पण लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या आणि मृत्यू हे महाराष्ट्रात आहेत. त्यावर नियंत्रण ठेवायचं असेल तर सर्वांचं लसीकरण हाच पर्याय आहे. अशात लसीकरणाचा वेग मंदावल्यास कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊन तिसऱ्या लाटेला सामोरं जावं लागणार आहे असं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
रोज 8 लाख लसींची गरज, पुरवठा मात्र 1 लाख लसींचा
राज्यात आतापर्यंत 1.5 कोटी नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. राज्यातील नागरिकांचं सरसकट मोफत लसीकरण केलं जाणार आहे, असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र एवढ्या सगळ्या नागरिकांचं लसीकरण करण्यास 1 मे पासून आवश्यक लसी उपलब्ध होणार नाहीत. मे अखेरीपर्यंत लसी कदाचित मिळू शकतात. त्यावेळी लसीकरण सुरु होऊ शकतं, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. राज्याला दिवसाला 8 लाख डोसची गरज आहे. मात्र सध्या राज्याला 1 लाख डोस मिळत आहेत. लसी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या तर येत्या सहा महिन्यात हे लसीकरण पूर्ण करता येणे शक्य आहे. तेवढी सुविधा राज्यात उपलब्ध आहे, असं राजेश टोपे यांनी म्हटलं.
राज्यात बुधावारी 63,309 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली असून 61,181 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 37,30,729 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.4 टक्के एवढे झाले आहे. राज्यात बुधवारी सर्वाधिक 985 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5 % एवढा आहे.
महत्वाच्या बातम्या :