कोल्हापूर-सांगलीला पुन्हा पुराचा धोका? पंचगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे. यंदा पंचगंगा नदी ही पहिल्यांदाच पात्राच्या बाहेर पडली आहे.
कोल्हापूर/सांगली : मागील वर्षी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला पावासाचा मोठा फटका बसला होता. अतिवृष्टीमुळे या भागात महापूर आल्याने अतोनात नुकसान झालं होतं. तशीच काहीशी परिस्थिती यंदाही होताना दिसत आहे. यंदाच्या पावसाळ्यात कोल्हापुरात पंचगंगा नदी ही पहिल्यांदाच पात्राच्या बाहेर पडली आहे. गेल्या 24 तासांत पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तब्बल 16 फुटांनी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठावर असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर सलग दुसऱ्या दिवशी सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होताना पाहायला मिळत आहे. सध्या पंचगंगा ही 31 फुटांवरून वाहत आहे. परिणामी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केलं आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून पंचगंगा आज रात्री इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोल्हापूरवासीयांना पुराची आठवण
कोल्हापूर शहरामध्ये देखील पावसाचा जोर वाढला असून सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. कोल्हापुरातील शाहूपुरी या ठिकाणी अवघ्या दोन तासात पाणी साचलं आहे. त्यामुळे नागरिकांनी गेल्या वर्षीच्या पुराची आठवण झालीय. तर कोल्हापुरात जोतिबा-केर्ली हा मार्ग गेल्या वर्षी ज्या ठिकाणी खचला होता त्याच ठिकाणी पुन्हा खचला आहे. हा मार्ग आता वाहतुकीसाठी बंद केला आहे. पंचगंगेची सध्याची पाणी पातळी 29 फूट 7 इंच इतकी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सलग दोन दिवस पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. तसंच धरणक्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे.
मुंबईला पावसाने झोडपलं; रेल्वे ठप्प, शासकीय कार्यालयं बंद, कांदिवलीत दरड कोसळली
सलग दुसऱ्या दिवशी सांगली जिल्ह्यात मुसळधार सलग दुसऱ्या दिवशी सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. शिराळा तालुक्यात आणि चांदोली परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने वारणा नदीवरील तीन लहान बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर वारणा नदीवरील काखे मांगले पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या गावाचा संपर्क तुटला आहे. पावसाच्या या जोरदार बॅटिंगमुळे भात पिकाला जोमदार असा पाऊस मिळाला आहे. यामुळे शेतकरी वर्ग उत्साहात आहे. पण सततच्या पावसाने वारणा आणि कृष्णा नदी पात्रामध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने अनेक बंधारे आणि पूल पाण्याखाली गेले आहेत.
Kolhapur Rain | पंचगंगेच्या पाणी पातळीत 16 फुटांनी वाढ तर कृष्णा नदीची पाणी पातळी 5 फुटांनी वाढली