Political News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज एकाच व्यासपीठावर, काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष
आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
Political News : राज्यात सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा (Maharashtra Karnataka Border Dispute) प्रश्न पेटला आहे. या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) एकाच व्यासपीठावर येणार आहेत. तसेच काँग्रसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात देखील या व्यासपीठावर उपस्थित असणार आहेत. कॅलिफोर्निया राज्याचे गव्हर्नर, गॅविन न्यूसम यांनी लिहिलेल्या 'सिटीझनविल' या पुस्तकाचा मराठी अनुवाद काँग्रेस नेते सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी केला आहे. त्यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात हे नेते एकत्र येणार आहेत.
सत्यजीत तांबे यांनी 'सिटीझनविल' या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. हा सोहळा मुंबईतील नरीमन पॉईंट इथल्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आज होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच काँग्रेस विधीमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात, प्रेरणादायी विचार देणारे गौरगोपाल दास, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आणि राष्ट्रीय स्टॉक एक्स्चेंजचे सीईओ आशिष चौहान हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती पुण्यातील अमेय प्रकाशनचे उल्हास लाटकर यांनी दिली.
सत्यजीत तांबे काय म्हणाले?
आपल्याला खरोखरंच महासत्ता बनायचं असेल तर आपण सतत जगभरच्या उत्तम पद्धतींचा स्वीकार करण्यासाठी झटलंच पाहिजे, अशी माझी धारणा असल्याचे सत्यजीत तांबे म्हणाले. कॅलिफोर्नियाचे लेफ्टनंट गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी आपल्या 'सिटीझनवील : हाऊ टू टेक द टाऊन स्क्वेअर डिजिटल अँड रिइन्व्हेंट गव्हर्नमेंट' या लक्षवेधी पुस्तकात केवळ 'सुशासनातील सार्वजनिक सहभाग? या विषयावरचे आपले आगळेवेगळे दृष्टिकोन आणि सॅन फ्रान्सिस्कोचे महापौर म्हणून आलेले आपले फक्त अनुभवच मांडलेले नाहीत, तर अमेरिकेतील विविध स्थानिक सरकारे आणि नागरिक यांनी परस्पर लाभदायक संबंध कशाप्रकारे विकसित केले आहेत. याची अनेक उदाहरणेही दिली आहेत. हे बदललेले संबंध नागरिकशास्त्राच्या पारंपरिक अभ्यासाच्या पुस्तकांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या लोकशाही शासनापेक्षा फारच वेगळ्या प्रकारच्या लोकशाहीचं प्रतिनिधीत्व करतात, असे तांबे म्हणाले.
'सिटीझनविल' पुस्तकाचे लेखक गॅविन न्यूसम हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याचे गव्हर्नर आहेत. सॅनफ्रान्सिस्कोचे महापौर असताना गॅविन न्यूसम यांनी या शहराच्या विकासासाठी राबवलेल्या उपक्रमांवर हे पुस्तक लिहिलेले आहे. शहर विकासासाठीच्या तंत्रज्ञान आणि लोकसहभाग या अत्यंत महत्वपूर्ण विषयावरील पुस्तकाचा काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी अनुवाद केला आहे. पुण्यातील अमेय प्रकाशनचे उल्हास लाटकर आणि सत्यजीत तांबे मित्र परिवार हे या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रक होते.
महत्त्वाच्या बातम्या: