कोरोनाकाळात सायकलची मागणी वाढली, दशकभरातील सर्वात मोठी वाढ
क्रिसिलनं दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात सायकलींची मागणी 1 कोटी 20 लाखांच्या आसपास होती. मात्र, चालू आर्थिक वर्षांत त्यामध्ये 1 कोटी 45 लाखांपर्यंत वाढ होईल.
मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे असंख्य उद्योगांचा आलेख घसरता आहे. मात्र, भारतातील सायकल उत्पादन उद्योगाला सुगीचे दिवस आले आहे. गेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच कोरोना लॉकडाऊन काळात देशात सायकलींची मागणी तब्बल 20 टक्क्यांनी वाढली आहे. क्रिसिल या संस्थेकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या दशकभरात सायकल उद्योगात नोंद करण्यात आलेली ही सर्वात मोठी वाढ ठरली आहे.
क्रिसिलनं दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात सायकलींची मागणी 1 कोटी 20 लाखांच्या आसपास होती. मात्र, चालू आर्थिक वर्षांत त्यामध्ये 1 कोटी 45 लाखांपर्यंत वाढ होईल. लोकांमध्ये फिटनेसविषयी आलेली जागृकता आणि कोरोना काळात घरीच बसल्यामुळे असलेला बराचसा मोकळा वेळ यासाठी कारणीभूत ठरल्याचं देखील निरीक्षण क्रिसिलच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
कोरोना काळात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्यायामाचे महत्त्व वाढले. परंतु व्यायामशाळांसह व्यायामाच्या अन्य पर्यायांवरील निर्बंध कायम राहिल्याने अनेकांनी सायकलिंगचा पर्याय निवडला. त्यामुळे शहरी भागातील सायकलचा वापर वाढला. दररोज सायकल चालवल्याने पोटचा घेरा कमी होतो. तसेच गुडघेदुखी-टाचदुखी कमी होत असल्याचे सांगितले जाते.
सध्या लॉकडाउन काळात सर्व दुकानं बंद असल्यामुळे सायकलींची विक्री अद्याप अपेक्षेइतकी वाढू शकलेली नाही. मात्र, पुढच्या क्वार्टरमध्ये म्हणजेच एप्रिल ते जून या तीन महिन्यांमध्ये घटत चाललेली रुग्णसंख्या आणि वाढत चाललेलं लसीकरण या पार्श्वभूमीवर दुकानं उघडताच विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होईल, असा क्रिसिलचा अंदाज आहे.
पूर्वी सायकलला आपल्याकडेसुद्धा विशेष महत्व होते. ग्रामीण भागात सायकल असणे प्रतिष्ठेचं मानलं जायचं. काळानुसार सायकलकडे चांगलेच दुर्लक्ष झाले होते. परंतु कोरोनामुळे सुदृढ आरोग्याचे महत्त्व लोकांना कळले आणि त्यासाठी सायकलिंग किती उपयुक्त आहे हे देखील लोकांना कळून चुकले. त्यामुळे लोकांचा सायकलींकडे प्रचंड ओघ वाढत आहे.