Christmas Holidays | लाँग वीकेंडमुळं तीर्थक्षेत्रांसह समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी
अर्थात लाँग वीकेंडच्या निमत्तानं शहराकडून ग्रामीण भाग आणि गिरिस्थानांकडे जाणाऱ्यांचा आकडा लक्षणीयरित्या वाढल्याचं पाहायला मिळत आहे. परिणामी रस्त्यांवर असणारी वाहतूक कोंडीही वाढत आहे.
Christmas Holidays अर्थात (CHRISTMAS 2020) नाताळच्या सणाचं औचित्य साधत आप्तेष्टांना शुभेच्छा देत अनेकांचीच पावलं वळली आहेत ती म्हणजे काही पर्यटन स्थळांकडे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा सलग तीन दिवसांची सुट्टी अर्थात लाँग वीकेंडच्या निमत्तानं शहराकडून ग्रामीण भाग आणि गिरिस्थानांकडे जाणाऱ्यांचा आकडा लक्षणीयरित्या वाढल्याचं पाहायला मिळत आहे. परिणामी रस्त्यांवर असणारी वाहतूक कोंडीही वाढत आहे.
(ALIBAUG) अलिबाग, (GANPATIPULE) गणपतीपुळे, (RATNAGIRI) रत्नागिरी अशा समुद्र किनारी भागांसह (LONAVLA) लोणावळा, (MAHABALESHWAR) महाबळेश्वर आणि (NASHIK)नाशिक अशा ठिकाणी जाणाऱ्यांचीही संख्या अमाप असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे शहरी भागांतही जवळपासच्या मॉल आणि बाजारपेठांमध्ये नाताळच्या निमित्तानं लक्षवेधी झगमगाट आणि गर्दी पाहायला मिळत आहे.
छगन भुजबळांनी वाहतूक कोंडी सोडवत वाहनांना 'विना टोल' दिली वाट
तीर्थक्षेत्रांनाही पसंती....
फक्त समुद्र किनारे आणि गिरिस्थानंच नव्हे, तर अनेक पर्यटकांनी सुट्टीच्या या दिवसांसाठी थेट तीर्थक्षेत्रांना भेट देण्याला प्राधान्य दिलं आहे. पंढरपूर, शिर्डी, कोल्हापूरची अंबाबाई अशा मंदिरांमध्ये भाविकांची रिघ पाहायला मिळत आहे. शिर्डी साईबाबा मंदिर संस्थानच्या वतीनं कोरोना व्हायरसच्या संसर्गाचं गांभीर्य लक्षात घेत भाविकांसाठी ऑनलाईन पासची व्यवस्था केली आहे. असं असलं तरीही इथं सुट्टीच्या निमित्तानं येणाऱ्यांचा आकडा वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
तिथं करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. याच धर्तीवर मंदिर प्रशासनाकडून सर्वतोपरी काळजीही घेण्यात येत आहे. पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्यांचा आकडाही लक्षणीय आहे. शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठीही मुंबई, पुणे, नाशिक येथून भाविकांनी येण्यास सुरुवात केली आहे. पुढील तीन दिवसांसाठी मंदिर प्रशासनाकडून देण्यात येणारे ऑनलाईन पासही फुल्ल असल्याची बाब समोर आली आहे. तब्बल नऊ महिन्यांनंतर मंदिराची कवाडं खुली झाल्यामुळं सरत्या वर्षाला निरोप देत येत्या वर्षाची सकारात्मक सुरुवात करण्याच्या हेतूनंच भाविकांचे पाय तीर्थक्षेत्रांकडे वळत आहेत.
त्र्यंबकेश्वर, अष्टविनायक गणपती मंदिरं, एकविरा देवी मंदिर, श्री सिद्धीविनायक अशा अनेक तीर्थक्षेत्रांकडे येणाऱ्यांचा ओघ पुढील काही दिवसांमध्ये वाढतच राहणार आहे. सुट्टीचा आनंद घेण्यासाठीचं हे वातावरण आनंददायी असलं तरीही इथं कोरोनाबाबत सजग असणं आणि सावधगिरी बाळगत आपली आणि इतरांची काळजीही घेणं तितकंच महत्त्वाचं असल्याचं आवाहन सर्वांनाच प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांकडून करण्यात येत आहे.