बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराचं थेट लोणार सरोवरशी कनेक्शन? मेडीकल कॉलेजच्या डीननेच सांगितलं
बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमधील सहा गावांमध्ये केस गळून टक्कल पडण्याचं प्रमाण झपाट्याने वाढतंय.
बुलढाणा : जिल्ह्यातील टक्कल पडण्याच्या आजारावर अकोला शासकीय वैद्यकीय (Medical) महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी एक मोठी शक्यता व्यक्त केली आहे. येथील टक्कल पडण्याच्या आजाराचे थेट लोणार सरोवरशी कनेक्शन जोडण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. लोणार येथील सरोवराचे पाणी भूगर्भात मोठ्या प्रमाणात खोल झिरपल्यामुळे त्यातील घटकांमुळे हा आजार होण्याची शक्यता असल्याचा अंदाज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी व्यक्त केली आहे. अकोला येथे 'एबीपी माझा'शी बोलताना त्यांनी बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातल्या सध्या सुरू असलेल्या आजारावरील चर्चेवर भाष्य केलं. दरम्यान, शेगाव तालुक्यातील केस गळती व टक्कल बाधितांची संख्या पोहचली 100 वर पोहोचली असून गुरुवारी नवीन 36 टक्कल बाधित रुग्ण आढळले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमधील सहा गावांमध्ये केस गळून टक्कल पडण्याचं प्रमाण झपाट्याने वाढतंय. आतापर्यंत या सहा गावांमधील 51 लोकांचे केस गळालेयेत. यासंदर्भातील वृत्त सर्वात आधी 'एबीपी माझा'ने दाखवलं होतं. त्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. बुलढाणा येथील आरोग्य विभागाने या गावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी नागपूरच्या प्रादेशिक प्रयोगशाळेत पाठवले आहेत. आता या आजारासंदर्भातील तथ्य शोधण्यासाठी अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानेही पुढाकार घेतला आहे. अकोला शासकीय महाविद्यालयाने या गावातील सात रुग्णांच्या डोक्याचे त्वचेचे नमुने बायोप्सीसाठी घेतले. पाणी आणि त्वचे संदर्भातील अहवालाला किमान सात दिवसाचा कालावधी लागणार आहे. त्यानंतरच या आजारासंदर्भातील नेमके कारण समोर येणार असल्याचे सांगण्यात आले.
7 दिवसांत येईल अहवाल
टक्कल पडण्याचा आजार हा त्वचारोग असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अकोला शासकीय महाविद्यालयाने या गावातील सात रुग्णांच्या डोक्याचे त्वचेचे नमुने बायोप्सीसाठी घेतले आहेत. त्वचेसंदर्भातील अहवाल येण्यास किमान 7 दिवसाचा कालावधी लागणार आहे. पाण्यात क्षारांचे प्रमाण असल्याने हा आजार झाला असण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. अखेर, अहवालानंतरच यातील खरे तथ्य समोर येईल. लोणार येथील सरोवराचे पाणी भूगर्भात मोठ्या प्रमाणात झिरपल्यामुळे त्यातील घटकांमुळे हा आजार होण्याची शक्यता असल्याचे प्राथमिक मत वैद्यकीय अधिष्ठातांकडून वर्तवण्यात आले आहे. त्यामुळे, टक्कल पडणाऱ्या आजाराचं थेट लोणार सरोवरशी कनेक्शन असल्याचं समोर येत असून अहवालानंतरच याबाबतची स्पष्टता होईल.
पाण्यात नायट्रेटचं प्रमाण
जिल्ह्यातील केस गळतीच्या प्रकारणातील पाण्याचा पहिला अहवाल प्राप्त झाला होता. हे पाणी वापरणे पिण्यायोग्य नाही, असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी म्हटलं होतं. येथील पाण्यात नायट्रेटच प्रमाण जास्त असून जे 10 टक्के असायला पाहिजे, ते मात्र 54 टक्के आहे. तसेच क्षाराचे प्रमाण 2100 आहे, ते फक्त 110 असायला पाहिजे. त्यामुळे या भागातील पाणीच घातक असून आरसेनिक, लीड व रासायनिक घटक तपासणीसाठी ह्या पाण्याचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचंही आरोग्य अधिकारी अमोल गिते यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यातील पाण्याचे सँपल हे 3 तारखेचं असून तपासणी 6 तारखेला संबंधित यंत्रणेने केली आहे, पाणी डंप केल्याने काही प्रमाणात नायट्रेटचं प्रमाण वाढू शकत. त्यामुळे, नायट्रेटचं प्रमाण वाढल्याने केस गळतात किंवा टक्कल पडतं, अस "या " केसेस मध्ये म्हणता येणार नाही, असेही सांगण्यात येत आहे.
हेही वाचा
धक्कादायक! परफ्यूमवरील तारखा बदलताना बाटल्यांचा स्फोट; पती-पत्नीसह 4 जण जखमी