एक्स्प्लोर
तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ अपघातात मृत्युमुखी, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला घटना

उमरखेड (उस्मानाबाद) : तीन बहिणीत एकुलता एक असलेल्या भावाला राखी बांधण्यासाठी बहिणी माहेरी येणार होत्या. मात्र नियतीने क्रूर खेळ खेळला. या तिघींचा लाडका भाऊराया अपघातात काळाने हिरावून नेला. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने तालुक्यातील देवसरी येथे शोककळा पसरली. पुंजाराम रामराव देवसरकर असे मृताचे नाव आहे. आई-वडिलांना एकुलता एक असलेला पुंजाराम रक्षाबंधनाला बहिणी घरी येणार असल्याने उत्साहात होता. बुधवारी तो काही कामानिमित्त आपल्या दुचाकीने उमरखेडला जात होता. त्यावेळी साखरा गावाजवळील पुलावर त्याची दुचाकी स्लीप झाली. तो खाली कोसळला. डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच ठार झाला. पुंजारामला राखी बांधण्यासाठी त्याच्या पद्मावती, रेणुका आणि वनिता या तीन बहिणी गुरुवारी येणार होत्या. परंतु भावाला राखी बांधण्याऐवजी त्याच्या अंत्यसंस्कारात उपस्थित राहण्याची वेळ त्यांच्यावर आली. बुधवारी भावाचे कलेवर पाहून या तीन बहिणींचा आक्रोश गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणत होता. या अपघाताची दखल पोलिसांनी घेतली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आणखी वाचा























