एक्स्प्लोर
एका मिनिटात 240 दोरीवरच्या उड्या, नगरच्या चिमुरड्याचा विक्रम
![एका मिनिटात 240 दोरीवरच्या उड्या, नगरच्या चिमुरड्याचा विक्रम Ahmednagar Kid Creates Record By Jumping 140 Times In A Minute Using Skipping Rope एका मिनिटात 240 दोरीवरच्या उड्या, नगरच्या चिमुरड्याचा विक्रम](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/28170432/Ahmednagar-Dori-Udya.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अहमदनगर : अहमदनगरमधील प्रतीक नागरगोजे या सात वर्षांच्या चिमुरड्यानं भीमपराक्रम केला आहे. एका मिनिटात तब्बल 240 वेळा दोरीवरच्या उड्या प्रतीकने मारल्या. वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाने प्रतीकच्या विक्रमाची दखल घेतली आहे.
मूर्ती लहान, पण कीर्ती महान अशी ओळख प्रतीकला मिळाली आहे. राष्ट्रीय पातळीवर विक्रम रचल्यानंतर आता प्रतीकला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याचा ध्यास लागला आहे.
वाऱ्याच्या वेगानं... पापणी लवते न लवते तोच प्रतीकने दोरीवर काही उड्या मारलेल्या असतात. एका मिनिटात तब्बल 240 दोरीवरच्या उड्या मारण्याची कामगिरी केली आहे अहमदनगरच्या प्रतीक नागरगोजे या दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं...
एक पायावर, दोन पायावर, जॉगिंग, स्टाइलिशसह वेगवेगळ्या उड्या मारतानाचं पदलालित्य, शरीराचा समन्वय... हे नजरेत भरणारं आहे. प्रतीकच्या याच पराक्रमाची वर्ल्ड रेकॉर्ड इंडियानं दखल घेतली आहे. एका मिनिटानं प्रतीकच्या अयुष्याला कलाटणी दिली आहे.
प्रतिकच्या वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचं रहस्य दडलंय ते दंगल सिनेमात. सराव करुन थकल्यानंतर हाच सिनेमा पाहून प्रतीक नव्या जोमानं सराव करायचा आणि पाहता पाहता त्यानं विक्रमाला कधी गवसणी घातली, ते कळलंच नाही. निवड समितीच्या सदस्यानं प्रतीकचा वेग पाहून 'ऐसा तुफानी बच्चा आज तक नही देखा' अशी कौतुकाची थाप दिली आहे.
प्रतीक नवीन मराठी शाळेत दुसरीत शिकत आहे. मात्र इतर मुलांच्या तुलनेत प्रतीकची उंची कमी असल्याची सल आईला बोचत होती. मुलाची उंची वाढवण्यासाठी त्यांनी इंटरनेटसह अनेक ठिकाणांहून माहिती गोळा केली. दोरीवरच्या उड्यांमुळे उंची वाढत असल्याचं त्यांना समजलं.
जुलै 2016 पासून प्रतीकचा दोरीवरच्या उड्यांचा सराव सुरु झाला. दिवसागणिक उड्यांच्या वेगात कमालीची वाढ झाल्यानं त्यांनी विक्रम नोंदवण्याचा निर्णय घेतला.
प्रतीक सकाळी आणि सायंकाळी दोन वेळा तासभर दोरीवरच्या उड्यांचा सराव करतो. उड्या मारण्यापूर्वी हात, खांदा, पाय, कंबर, मनगट, गुडघ्यांचा व्यायाम करुन वॉर्म अप करतो. प्रतीकचा स्टॅमिना मेन्टेन ठेवण्यासाठी त्याला संतुलित अहार दिला जातो. दूध, अंडी, केळी, खारीक, खोबऱ्याचा खुराक त्याला दिला जातो.
दोरीवरच्या उड्या मारण्याबरोबरच प्रतीकचं अभ्यासावरही लक्ष आहे. शाळेचा अभ्यास तो नियमितपणे करतो. शालेय खेळातही त्याचा हिरीरीने सहभाग असतो. क्रिकेट, खो खो, धावणे, कबड्डीसह सर्वच खेळ प्रतीकला आवडतात. लष्करी अधिकारी होण्याची प्रतीकची इच्छा आहे. प्रतीक आता गिनीज बुकात विक्रम नोंदवण्याच्या ध्यासाने प्रयत्न करत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शिक्षण
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)