(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ketaki Chitale : शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट; अभिनेत्री केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात
Actress Ketaki Chitale Detained : अभिनेत्री केतकी चितळे हिला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शरद पवार यांच्याविरोधात तिने आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती.
Actress Ketaki Chitale Detained : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कळवा पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.
केतकी चितळे हिला नवी मुंबई पोलिसांनी कळंबोली येथून ताब्यात घेतले आहे. तिचा शोध ठाणे गुन्हे शाखा करत होती. आता ठाणे गुन्हे शाखेची टीम रवाना झाले असून तिला नवी मुंबई पोलिसांकडून ठाणे गुन्हे शाखा ताब्यात घेणार आहे. सध्या कळंबोली इथे असलेल्या तिच्या मावशीच्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नवी मुंबई पोलिसांकडून ताबा मिळाल्यानंतर केतकी हिला ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले जाणार आहे. त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
केतकीविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुणे सायबर विभागाकडे तक्रारी दाखल केली.
ठाणे पोलिसांचे व नवी मुंबई पोलिसांचे अभिनंदन आभार #ketakichitale ला घेतले ताब्यात #केतकीचितळे
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 14, 2022
प्रकरण काय?
अॅडव्होकेट नितीन भावे नावाच्या व्यक्तीने लिहिलेली पोस्ट केतकी चितळेने शेअर केली होती. नुकतंच शरद पवारांनी जवाहर राठोड यांची कविता सादर केली होती. त्यानंतर त्यावरुन भाजपकडून टीका झाली होती. याच कवितेच्या अनुषंगाने केतकीनं ही पोस्ट शेअर केली असावी. या पोस्टमध्ये शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करण्यात आली आहे. केतकीने ही कविता शेअर केल्यानंतर राज्यभरातून संतापजनक प्रतिक्रिया उमटू लागल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कळवा, मुंबईसह इतर ठिकाणी केतकी विरोधात तक्रारी दाखल केल्यात.
राष्ट्रवादीचा भाजप-संघावर निशाणा
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी संघावर निशाणा साधला आहे. केतकी चितळे असेल किंवा शरद पवार यांना जीवे मारण्याबाबत ट्वीट करणारा भामरे असेल. यांना लहानपणी संघाच्या शाखेत जे विषारी बाळ कडू मिळालं त्याची उदाहरणे असल्याचे चव्हाण यांनी म्हटले. हे सगळं घडवून आणण्याचं काम विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून होतं आहे. त्यांनी गावा गावात 25-25 हजार रुपये पगार देऊन ट्रोलर्स नेमले आहेत. त्याच्या माध्यमातून अशाप्रकारे विष पसरवण्याचा प्रयत्न होतं असल्याचा आरोप विद्या चव्हाण यांनी केला.
राष्ट्रवादी युवती काँग्रेच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनीदेखील अभिनेत्री केतकी चितळेवर टीका केली. केतकी चितळे सारख्या विकृतींना संघाच पाठबळ असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सातत्याने शरद पवार यांच्याविरोधात खालच्या पातळीवर टीका सुरू असल्याचा आरोप सक्षणा सलगर यांनी केला. मालिका दिग्दर्शक निर्मात्यांनी अशा विकृतींना थारा देता कामा नये. अन्यथा आम्हाला वाहिनीवरील बहिष्कारासोबतच कार्यक्रमही उधळून लावावे लागतील असा इशाराही सलगर यांनी दिला आहे.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेत्री केतकी चितळेवर टीका केली आहे. केतकी इतकी विकृत असेल असे वाटले नव्हते. तिने काय लिहिले आहे हे जरा वाचा आणि तुमच्या आजोबां बद्दल वडिलांबद्दल असा कोणी लिहिलं तर काय वाटेल याचाही विचार करा असे आवाहनही आव्हाड यांनी केले