(Source: ECI/ABP News/ABP Majha)
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले खोकेवाल्या गद्दारांनी...
Aaditya Thackeray : धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर आणि पक्षाचं नाव वापरण्यावरही निवडणूक आयोगानं बंदी घातल्यानंतर आमदार आदित्य ठाकरे यांची संतप्त प्रतिक्रिया आली आहे.
Aaditya Thackeray : धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर आणि पक्षाचं नाव वापरण्यावरही निवडणूक आयोगानं बंदी घातल्यानंतर आमदार आदित्य ठाकरे यांची संतप्त प्रतिक्रिया आली आहे. तसेच ट्वीट करत आदित्य ठाकरे यांनी लढणार आणि जिंकणारच असा विश्वासही व्यक्त केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये एकनाथ शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. आदित्य ठाकरे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, 'खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. ' लढणार आणि जिंकणारच! आम्ही सत्याच्या बाजूने! सत्यमेव जयते! असेही आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
आदित्य ठाकरे यांचं ट्वीट -
खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवेसना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 8, 2022
लढणार आणि जिंकणारच!
आम्ही सत्याच्या बाजूने!
सत्यमेव जयते! pic.twitter.com/EBI1GmVEkt
हा धक्कादायक निर्णय - चंद्रकांत खैरे
आम्हाला याचं मोठं दु:ख झालं आहे. हा निर्णय धक्कादायक आहे. शिवसैनिकांसाठी हे फारच क्लेषदायक आहे. मराठी माणसांसाठी आणि हिंदुत्वासाठी हे धोकादायक आहे. गद्दारांचं हे पाप कधीही धुतलं जाणार नाही. बाळासाहेबांनी कष्टाने उभा केलेल्या शिवसेनेची अवस्था ही गद्दारांनी केली आहे, असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे म्हणाले.
ठाकरे आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगासमोर आपापले दावे करण्यात आले होते. ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगाची मॅरेथॉन बैठक पार पडली आणि या बैठकीत दोन्ही दाव्यांवर विचार करण्यात आला. त्यानंतर शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आल्याचं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं. शनिवारी निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला. शिवसेनेची शान असलेला धनुष्यबाण आता कुणालाही वापरता येणार नाही, एवढंच नाही तर शिवसेना पक्षाचं नावही वापरता येणार नाही. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. कारण, अंधेरी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे शिवसेनेला पूर्वतयारी करण्यासाठी पुरेसा वेळ नाही.
दोन्ही गटाकडून बैठकीचं आयोजन -
निवडणूक आयोगाच्या निर्णायानंतर दोन्ही गटाकडून बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुढील रणनीतीवर चर्चा होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णायानंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक बोलवली होती. त्याशिवाय उद्या दुपारी साडेबारा वाजता मातोश्रीवर पुन्हा बैठक होणार आहे. तर रविवारी वर्षा बंगल्यावर शिंदे गटाची संध्याकाळी सात वाजता बैठक होणार आहे. बैठकीला सर्व महत्वाचे नेते हजर राहणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :
'धनुष्यबाण' चिन्ह आणि 'शिवसेना' नाव कधीपर्यंत गोठवलं?; निवडणूक आयोगाच्या निर्णयातील महत्वाचे 10 मुद्दे
Shiv Sena Symbol: 'धनुष्यबाण' कुणालाच नाही! शिवसेना नावही वापरायचं नाही; आता ठाकरे अन् शिंदेंसमोर पर्याय काय?
Shiv Sena Symbol: 'धनुष्यबाण' कुणालाच नाही! शिवसेना नावही वापरायचं नाही; आता ठाकरे अन् शिंदेंसमोर पर्याय काय?