Shiv Sena Symbol: 'धनुष्यबाण' कुणालाच नाही! शिवसेना नावही वापरायचं नाही; आता ठाकरे अन् शिंदेंसमोर पर्याय काय?
निवडणूक आयोगाचा चिन्ह गोठवण्याचा निर्णय फक्त अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी तात्पुरत्या स्वरुपात घेण्यात आला आहे. आगामी काळात ठाकरे गट आणि शिंदे गट काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Group : उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटातील (Eknath Shinde) लढाईत दोन्ही गटाला निवडणूक आयोगानं दणका दिला आहे. शिवसेनेची शान असलेला धनुष्यबाण आता कुणालाही वापरता येणार नाही, एवढंच नाही तर शिवसेना पक्षाचं नावही वापरता येणार नाही. असं असलं तरी हा तात्पुरत्या स्वरुपाचा निर्णय आहे. निवडणूक आयोगाचा चिन्ह गोठवण्याचा निर्णय फक्त अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी तात्पुरत्या स्वरुपात घेण्यात आला आहे. आगामी काळात ठाकरे गट आणि शिंदे गट काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण या ठिकाणी शिवसेनेचे आमदार होते. रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे.येत्या पोटनिवडणुकीत शिंदे गटाकडून याठिकाणी उमेदवारच दिला जाणार नाही, त्यामुळं शिंदे गटाला तसाही या निर्णयाचा विशेष फटका बसणार नाही. ठाकरे गटाला मात्र हा मोठा झटका आहे.
दोन्ही गटांना नव्या चिन्हाची निवड करण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या या लढाईचा आज अखेर निकाल लागला. निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्हं गोठवलंय. आता ठाकरे आणि शिंदे गटांना धनुष्यबाणाचं चिन्हं वापरता येणार नाही. सोबतच निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नावदेखील वापरण्यास मनाई केलीय. दोन्ही गटांना नव्या चिन्हाची निवड करण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दोन्ही गटाला नव्या नावासाठी आणि चिन्हासाठी तीन तीन पर्याय दिले जाणार आहेत, असं देखील निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.
या निर्णयानंतर दोन्ही गटाच्या नेत्यांकडून हा अनपेक्षित निर्णय असल्याचं म्हटलं आहे. तर ठाकरे गटाच्या नेत्यांनी हा धक्कादायक निर्णय असल्याचं म्हटलं आहे. ठाकरे आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगासमोर आपापले दावे करण्यात आले होते. ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगाची मॅरेथॉन बैठक पार पडली आणि या बैठकीत दोन्ही दाव्यांवर विचार करण्यात आला. त्यानंतर शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आल्याचं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं.
आता ठाकरे अन् शिंदेंसमोर पर्याय काय?
राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणाले की, आता या अंतरीम निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात अपील करु शकतील मात्र आता तेवढा वेळ नाही. कारण अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा अर्ज भरण्याची मुदत 13 तारखेचा आहे. त्यामुळं त्याआधी त्या आदेशाला स्थगिती मिळवावी लागेल. सर्वोच्च न्यायालयानं या निर्णयाला स्थगिती दिली तरच शिवसेनेला हे चिन्ह मिळू शकेल, असं देशपांडे म्हणाले.
दोन्ही गटांनी प्रभावीपणे केला होता दावा..
तत्पूर्वी ठाकरे गटानं आज त्यांच्याकडील महत्त्वाची माहिती निवडणूक आयोगात सादर केली होती. शिवाय अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवारच नाही मग चिन्ह का मागतायत असा सवाल ठाकरे गटानं निवडणूक आयोगासमोर केला होता. शिवाय शिंदेंनी अद्याप उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर दावा केलेला नाही. त्यामुळे चिन्हाबाबतचा दावा पक्षप्रमुखांच्या परवानगीविना होऊ शकत नाही असं ठाकरे गटानं म्हटलं होतं. आमच्याकडे राजधानी दिल्लीमध्ये दहा लाखांपेक्षा अधिक शपथ पत्र तयार आहेत. अडीच लाख पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे आणि दहा लाखांपेक्षा अधिक प्राथमिक सदस्यांची शपथपत्रे तयार आहेत. फक्त विहित नमुन्यामध्ये ती सादर करण्यासाठी आम्हाला चार आठवड्यांचा वेळ मिळावा. जर निवडणूक आयोगाला ती आत्ता आहे त्या स्थितीत हवी असतील तर ती पण आम्ही सादर करू, असा दावा उद्धव ठाकरे गटाचा निवडणूक आयोगासमोर केला होता.