Kolhapur News : गावच्या रस्त्यासाठी उपोषणाला बसलेल्या इंजिनिअर तरुणाचे उपोषण मागे; बीडीओकडून लेखी आश्वासन
बीडीओकडून लिखित आश्वासन मिळाल्यानंतर इंजिनिअर रोहन मगदूमने उपोषण मागे घेतले. शुक्रवारी संध्याकाळी 25 वर्षीय रोहन मगदूम आणि त्याचा 31 वर्षीय भाऊ राहुलने लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले.
Kolhapur News : कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यातील शिरोळ (Shirol) तालुक्यातील नांदणी गावच्या इंजिनिअर रोहन मगदुमने 700 मीटर रस्त्याला निधी मंजूर होऊनही गेल्या 330 दिवसांपासून काम सुरु करण्यात न आल्याने आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. मात्र, उपोषणाच्या तिसऱ्या दिवश प्रशासनाला जाग आली. बीडीओकडून लिखित आश्वासन मिळाल्यानंतर रोहनने उपोषण मागे घेतले. शुक्रवारी 25 वर्षीय रोहन मगदूम आणि त्याचा 31 वर्षीय भाऊ राहुलने लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले. शुक्रवारपर्यंत रोहनची प्रकृतीही ढासळू लागली होती. ऑक्सिजन पातळी आणि रक्तदाब दोन्ही कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. नांदणी गावातील त्या भावांसोबत अनेक स्थानिक शेतकरीही सामील झाले होते.
पावसाळ्यात रस्ता अत्यंत चिखलमय होतो. त्या चार महिन्यांत आमच्या शेतात किंवा जवळपासच्या इतर शेतात प्रवेश करणे जवळजवळअशक्य असल्याचे गेल्या चार वर्षांपासून एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत असलेल्या रोहनने सांगितले. अनेकदा शेतकरी चिखलात अडकतात किंवा घसरून पडल्याने जखमी, फ्रॅक्चर होतात. माझ्या वडिलही दोनवेळा घसरूनव पडले होते माझी आजीही या आधी या मार्गावर पडली होती, असेही त्याने सांगितले.
पावसाळ्यात पिकांची कापणी करणार्या शेतकर्यांसाठी शेतापर्यंतचा रस्ता अत्यावश्यक आहे. शेतकरी या रस्त्याचा वापर त्यांच्या शेतजमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच शेतमाल बाहेर काढण्यासाठी तसेच जवळच्या बाजारपेठेत विक्रीला नेण्यासाठी वापरतात. बुधवारी उपोषणाच्या पहिल्या दिवशी स्थानिक आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी रोहनला फोन करून लवकरच रस्ता करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. ग्रामपंचायत व तहसील अधिकार्यांनीही भेट दिली व या प्रक्रियेला गती देण्यासाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीही स्थानिक अधिकाऱ्यांना या समस्येचे निराकरण करण्यास सांगितले होते.
रोहन का बसला होता उपोषणाला?
नांदणीमधील हुवाज मळा ते बसवेश्वर मंदिर या अवघ्या 600 मीटर रस्त्यासाठी 24 लाख रुपयांचा निधी 22 मार्च 2022 रोजी निधी मंजूर करण्यात आला. हा निधी शिंदे गटाचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर (Rajendra Patil Yadravkar) यांच्या फंडातून मंजूर करण्यात आला होता. मात्र, गेल्या 11 महिन्यांपासून काहीही काम झालेलं नव्हतं. या मार्गावर चिखलाचे साम्राज्य असल्याने अनेक अपघात होते होते. या रस्त्याची आमदार, बीडीओ, ग्रामपंचायत अशा कोणाकडूनही दखल घेण्यात आलेली नव्हती. कोणाकडेही गेल्यानंतर जबाबदारी ढकलण्याचा खेळ सुरु असतो, असे रोहनने म्हटले होते.
इतर महत्वाच्या बातम्या