Bihar JDU Meeting : बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग, नितीश कुमारांनी बोलावली खासदार आणि आमदारांची बैठक, राजकीय वर्तुळाचं लक्ष
आज नितीश कुमार यांच्या घरी जेडीयूचे खासदार आणि आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत युतीच्या भवितव्याबाबत पुढचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Bihar JDU Meeting : बिहारमध्ये (Bihar) सध्या राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. बिहारमध्ये सत्ताधारी असणारा मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांचा जनता दल (JDU ) आणि भाजप (BJP) यांच्यात संघर्ष सुरु आहे. हे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र आहेत. मात्र, या दोन्ही पक्षातील संघर्ष आता अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर आज नितीश कुमार यांच्या घरी जेडीयूचे खासदार आणि आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत युतीच्या भवितव्याबाबत पुढचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जेडीयूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह यांनी पक्ष सोडल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे.
दरम्यान, बैठकीच्या एक दिवस आधी जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी म्हणाले, नितीश कुमार हे जेडीयूचे सर्वोच्च नेते आहेत. पक्षातील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा आदर आहे. त्यामुळं पक्षात फूट पडण्याचा प्रश्नच येत नाही. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष जो काही निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असेल अशी माहिती केसी त्यागी यांनी दिली आहे. दरम्यान सध्या घडणाऱ्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी आरजेडीने सकाळी 11 वाजता राबरी निवासस्थान 10 सर्कुलर रोडवर आपल्या आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे. दुसरीकडे, जीतनराम मांझीही संध्याकाळी 7 वाजता त्यांच्या पक्षाच्या आमदारांची निवासस्थानी बैठक घेणार आहेत.
नितीश कुमार पलटी मारणार का?
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोप समारंभाला आणि नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी समारंभाला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित राहिले नव्हते. तसेच दिल्लीत झालेल्या निती आयोगाच्या बैठकीला देखील नितीश कुमार हे उपस्थित राहिले नव्हते. ते उपस्थित न राहिल्याने नितीशकुमार दुसरा काही राजीय निर्णय घेमार का? याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, यानंतर जेडीयू आपल्या कोणत्याही प्रतिनिधीला केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होण्यासाठी पाठवणार नसल्याचेही जाहीर केले आहे. आरसीपी सिंग हे जेडीयूच्या कोट्यातील मंत्री होते. त्यांना राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर राजीनामा द्यावा लागला होता. त्यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली नाही. त्यावरुन एनडीएच्या या दोन घटक पक्षांमध्ये सर्व काही ठीक नसल्याचे दिसत आहे.
दरम्यान, सध्याच्या राजकीय गोंधळात आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार आपल्या पक्षाच्या आमदार आणि खासदारांची बैठक घेणार आहेत. त्याचवेळी प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आणि काँग्रेसनेही बैठक बोलावली आहे. म्हणून बिहारच्या राजकारणात आज काही वेगळा निर्णय होणार का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: