'ये बिहार है...यहा कुछ भी हो सकता है!', बिहारमध्ये कोरोना चाचणी केलेल्यांच्या यादीत नरेंद्र मोदी, अमित शाह, राहुल गांधी आणि अनेक सेलिब्रेटी
Viral News : बिहारमध्ये कोरोना चाचणी केलेल्यांची एक यादी प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये पंतप्रधान मोदी, अमित शाह, राहुल गांधी, अक्षय कुमार यांच्यासोबत अनेकांची नावं असल्याचं उघड झालं आहे.
पटना : काय सांगताय? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये कोरोना चाचणी करुन घेतलीय, देशाचे गृहमंत्री अमित शाहंनीदेखील बिहारमध्ये कोरोना चाचणी केलीय. एवढंच नव्हं तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही त्यांची कोरोना चाचणी बिहारमधून करुन घेतलीय. हे आम्ही सांगत नाही तर बिहार सरकारच्या यादीत ही नावं सापडली आहेत. बिहारमध्ये कोरोना चाचणी झालेल्यांची एक यादी व्हायरल झाली आहे. बिहारच्या अरवल जिल्ह्यात कोरोना चाचण्या झालेल्यांची ही यादी आहे.
बिहारमधील कोरोना चाचणी झालेल्यांच्या या यादीतली नावं पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासकट अनेक सेलिब्रेटींची नावं या यादीत पाहायला मिळाली आहेत. अभिनेता अक्षय कुमारचीही कोरोना चाचणी झाली असून त्याचंही ठिकाण हे बिहारमध्ये असल्याचं नोंद करण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं या यादीत तब्बल तीन वेळा नाव आहे.
केवळ एवढंच नव्हे तर निक जोनाससोबत लग्न करुन परदेशात स्थायिक झालेली प्रियंका चोप्राचेही कोरोना चाचणी झालेल्यांच्या यादीत नाव आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे या सगळ्यांच्या चाचण्या एकाच दिवशी झाल्याचं नोंद आहे.
हे ऐकून तुमच्या डोळ्यासमोर सेलिब्रिटींसह नेत्यांची रांग आली असेल. पण, तुमच्या कल्पकतेला जरा ब्रेक लावा. असं काहीच घडलं नाही. पण कोरोना चाचणी झालेल्यांची एक यादी प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये या सर्वांचं नाव आहे.
बिहारमध्ये ही यादी व्हायरल झाली आणि दोन ऑरपेटर्संना कामावरुन काढून टाकण्यात आलं. पण, या घटनेमुळे एक प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे दिवसाला दीड लाख चाचण्या होत असल्याचा जो मुख्यमंत्री नितीश कुमारांनी दावा केला होता, त्याच दाव्यासाठी अशा बोगस याद्या बनवल्यात का? या यादीवरुन काँग्रेसनंही सरकारवर निशाणा साधलाय.
या आधीही बिहारमध्ये बोगस कोरोना चाचण्या आणि बोगस लसीकरणाच्या याद्या अनेक वेळा बाहेर आल्यात. 'ओ का है ना...ये बिहार है...यहा कुछ भी हो सकता है!'
महत्त्वाच्या बातम्या :