(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बिहार सरकारमध्ये राजकीय संघर्ष पेटणार? भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर जेडीयूचे नेते आरसीपी सिंह यांचा राजीनामा
Bihar Politics : भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर जेडीयूचे नेते आरसीपी सिंह यांनी अखेर राजीनामा दिला आहे.
Bihar Politics : भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर जेडीयूचे नेते आरसीपी सिंह यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर बिहारमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जेडीयूच्या खासदारांची बैठक बोलावली आहे. पक्षातील सर्व खासदारांना सोमवारी संध्याकाळपर्यंत पाटण्यात येण्यास सांगण्यात आले आहे. या बैठकीला जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह देखील उपस्थित राहणार आहेत. बैठकीचा विषय अद्याप जाहीर झालेला नाही. यामध्ये भाजपसोबतच्या युतीच्या भवितव्यावर चर्चा होऊ शकते.
याच दरम्यान जेडीयू नेते आणि बिहारचे शिक्षण मंत्री विजय चौधरी यांनी आपल्या पक्षाचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला जाणार नसल्याचे सांगितले आहे. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात जेडीयूच्या कोट्यातून कोणालाही मंत्री केले जाणार नाही, असे ते म्हणाले आहेत. नितीश कुमार यांनी यापूर्वीच याबाबत घोषणा केली होती.
आरसीपी सिंह यांनी राजीनामा का दिला?
माजी केंद्रीय मंत्री आणि जेडीयूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह यांच्यावर पक्षाच्या वतीने बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यानंतर आरसीपी सिंह यांनी शनिवारी संध्याकाळी त्यांनी पक्षातील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला. सांगण्यात येत आहे की, गेल्या काही महिन्यांपासून नितीश कुमार यांच्यासोबत त्यांचे वाद सुरु होते. याच दरम्यान जेडीयूने आरसीपी सिंह यांचे राज्यसभेचे तिकीट कापले होते. त्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रीपद सोडावे लागले. आरसीपी सिंग हे केंद्रात जेडीयू कोट्यातील एकमेव मंत्री होते.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजप-जेडीयू एकत्र लढणार?
देशात 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि एक वर्षानंतर बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाटणा येथील भाजपच्या अधिवेशनादरम्यान आगामी दोन्ही निवडणुका जेडीयूसोबतच लढवल्या जातील, असे स्पष्ट केले. मात्र युतीबाबत जेडीयूचे नेते स्पष्टपणे उत्तर देताना दिसत नाही. नुकतेच राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह म्हणाले की, ''आम्ही भाजपसोबत युतीची चर्चा नाकारत नाही. पण आता त्याबद्दल बोलण्यात अर्थ नाही. निवडणुका आल्या की बघू.''