Gujrat New CM : आज भूपेंद्र पटेल गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; अमित शाह, शिवराज सिंह चौहान यांची प्रमुख उपस्थिती
Gujrat New CM : गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भाजपनं पाटीदार समाजाचे नेता भूपेंद्र पटेल यांना पसंती दिली आहे. आज दुपारी भूपेंद्र पटेल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
![Gujrat New CM : आज भूपेंद्र पटेल गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; अमित शाह, शिवराज सिंह चौहान यांची प्रमुख उपस्थिती gujarat bhupendra patel oath today 2 pm know the detail Gujrat New CM : आज भूपेंद्र पटेल गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; अमित शाह, शिवराज सिंह चौहान यांची प्रमुख उपस्थिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/12/632694985e199dd8e866126963727ae0_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gujrat New CM : गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल यांची वर्णी लागली आहे. आज दुपारी 2.20 मिनिटांनी भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यानंतर दोन दिवसांनी कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी पार पडेल. गृहमंत्री अमित शाह या शपथविधी समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. ते आज दुपारी 12.30 मिनिटांनी अहमदाबादमध्ये पोहोचणार आहेत. याव्यतिरिक्त मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानही या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसाठी नितीन पटेल, मनसुख मांडवीया आणि पुरुषोत्तम रुपाला या तीन नेत्यांची नाव सर्वाधिक चर्चेत होती. मात्र नेहमीप्रमाणे भाजपने पुन्हा आश्चर्यचा धक्का देत मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या हाती गुजरातची कमान दिली.
रविवारी भाजपची एक महत्त्वाची बैठक पार पडली. याच बैठकीत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या नावावर मोहोर लावण्यात आली. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेक मोठमोठ्या नेत्यांची नावं चर्चेत होती. पण भाजपनं एका नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतला आणि पाटीदार समाजातून येणाऱ्या भूपेंद्र पटेल यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपावली. अशातच आज म्हणजेच, 13 सप्टेंबरपासून गुजरातमध्ये 'भूपेंद्र अध्याय' सुरु होणार आहे.
कोण आहेत भूपेंद्र पटेल?
भूपेंद्र पटेल पाटीदार समाजातून येतात. विजय रुपाणी सरकारमध्ये ते मंत्री राहिले आहेत. यासह, भूपेंद्र पटेल दीर्घ काळापासून संघाशी संबंधित आहेत. पटेल समाजातही त्यांची चांगली पकड आहे. त्याचबरोबर 2017 च्या निवडणुकीत त्यांनी चांगल्या मतांनी विजय मिळवला होता. भूपेंद्र पटेल विधानसभा निवडणूक 1 लाख 17 हजार मतांनी जिंकले होते. भूपेंद्र पटेल हे गुजरातच्या घाटलोडिया विधानसभेचे आमदार आहेत. यापूर्वी भूपेंद्र पटेल अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरणाचे (AUDA) अध्यक्ष होते. भुपेंद्र पटेल यांनी अहमदाबाद महानगरपालिकेच्या (एएमसी) स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.
गुजरातचे नवे मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपने केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि प्रल्हाद जोशी यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. दोन्ही नेते गांधीनगरमधील भाजपा कार्यालय श्री कमलम येथे पोहोचले होते. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भूपेंद्र पटेल यांच्या नावावर सहमती झाली. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा केली होती.
विधानसभा निवडणुकांना एक वर्ष राहिलं असताना रुपाणी यांचा राजीनामा...
गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुकांना जेमतेम वर्षभराचा अवधी शिल्लक असल्याने विजय रुपाणी यांचा राजीनामा अनेक राजकीय पंडितांना आश्चर्यचकित करणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याशिवाय विजय रुपाणी राजीनाम्याचा निर्णय घेऊ शकणार नाहीत, हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे. 26 डिसेंबर 2017 रोजी रुपाणी यांनी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. भाजपाने गुजरातमध्ये बहुमत मिळवले होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)