Gujarat New CM: गुजरातच्या पुढील मुख्यमंत्र्यांचे नाव समोर, भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब
Gujarat New CM: गुजरातच्या पुढील मुख्यमंत्र्यांचे नाव समोर आले आहे. भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय.
![Gujarat New CM: गुजरातच्या पुढील मुख्यमंत्र्यांचे नाव समोर, भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब Bhupendra Patel will be sworn-in as Gujarat CM, was elected as the new leader of BJP Legislative Party Gujarat New CM: गुजरातच्या पुढील मुख्यमंत्र्यांचे नाव समोर, भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/12/5f57191b7df25efc04154f0dca8d92ca_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gujarat New CM: गुजरातच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, भूपेंद्र पटेल यांची भाजप विधिमंडळ पक्षाचे नवे नेते म्हणून निवड झाली आहे. आता भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री असतील.
गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गांधीनगर येथील भाजप कार्यालयात झाली. या बैठकीत नवीन मुख्यमंत्री निवडले गेले. नवे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली आहे. भूपेंद्र पटेल हे घाटलोडिया मतदारसंघातून आमदार आहेत. वास्तविक, विजय रूपाणी यांनी शनिवारी अचानक गुजरातच्या सीएम पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज नवीन नाव निवडण्यात आले.
गुजरातचे नवे मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपने केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि प्रल्हाद जोशी यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. दोन्ही नेते गांधीनगरमधील भाजपा कार्यालय श्री कमलम येथे पोहोचले होते.
कोण आहेत भुपेंद्र पटेल?
भूपेंद्र पटेल पाटीदार समाजातून येतात. विजय रुपाणी सरकारमध्ये ते मंत्री राहिले आहेत. यासह, भूपेंद्र पटेल दीर्घ काळापासून संघाशी संबंधित आहेत. पटेल समाजातही त्यांची चांगली पकड आहे. त्याचबरोबर 2017 च्या निवडणुकीत त्यांनी चांगल्या मतांनी विजय मिळवला होता. भूपेंद्र पटेल विधानसभा निवडणूक 1 लाख 17 हजार मतांनी जिंकले होते. भूपेंद्र पटेल हे गुजरातच्या घाटलोडिया विधानसभेचे आमदार आहेत. यापूर्वी भूपेंद्र पटेल अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरणाचे (AUDA) अध्यक्ष होते. भुपेंद्र पटेल यांनी अहमदाबाद महानगरपालिकेच्या (एएमसी) स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.
विधानसभा निवडणुकांना एक वर्ष राहिलं असताना राजीनामा..
गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुकांना जेमतेम वर्षभराचा अवधी शिल्लक असल्याने विजय रुपाणी यांचा राजीनामा अनेक राजकीय पंडितांना आश्चर्यचकित करणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याशिवाय विजय रुपाणी राजीनाम्याचा निर्णय घेऊ शकणार नाहीत, हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे. 26 डिसेंबर 2017 रोजी रुपाणी यांनी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपाने गुजरातमध्ये बहुमत मिळवले होते. त्यामुळे आता नवे मुख्यमंत्री कोण याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)