Ghazipur Farmer Protest : गाजीपूर आंदोलनात अश्रूंनी पलटवली बाजू, रात्रभरात हाय व्होल्टेज ड्रामा
Farmer Protest : शेतकरी आंदोलन सरकार चिरडून टाकणार असं वाटत असतानाच ते पुन्हा उभं राहताना दिसतंय. काल सूर्यास्तानंतर इथे पोलीस फौजफाटा तैनात होता, मात्र आता तो कमी होऊन आंदोलक शेतकऱ्यांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे.
![Ghazipur Farmer Protest : गाजीपूर आंदोलनात अश्रूंनी पलटवली बाजू, रात्रभरात हाय व्होल्टेज ड्रामा Ghazipur Farmer Protest overnight high voltage drama Rakesh Tikait Ghazipur Farmer Protest : गाजीपूर आंदोलनात अश्रूंनी पलटवली बाजू, रात्रभरात हाय व्होल्टेज ड्रामा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/29211945/rakesh-tikait-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : दिल्लीतल्या गाजीपूर सीमेवरच्या आंदोलनात कालची रात्र निर्णायक ठरलीय. हे आंदोलन सरकार चिरडून टाकणार असं वाटत असतानाच ते पुन्हा उभं राहताना दिसतंय. काल सूर्यास्तानंतर इथे पोलीस फौजफाटा तैनात होता, मात्र आता तो कमी होऊन आंदोलक शेतकऱ्यांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. एका शेतकऱ्याच्या अश्रूंनी गाजीपूर आंदोलनाचा सगळा नूरच पालटला. काल रात्री पोलिसांची तयारी पाहून हे आंदोलन सकाळी सूर्य उजाडेपर्यंत राहतं की नाही चर्चा सुरु झाली होती. पण राकेश टिकैत यांच्या भावनावश व्हिडीओची लाट पश्चिमी उत्तर प्रदेशात जोरात उसळली. त्यामुळेच योगी सरकारच्या प्रशासनाला कारवाईचा विचार मागे ठेवत परतावं लागलं.
गाजीपूर सीमेवर दोन प्रमुख शेतकरी नेते आंदोलन करत होते. व्ही एम सिंह आणि राकेश टिकैत. त्यापैकी व्ही एम सिंह यांची संघटना नुकतीच आंदोलनातून बाहेर पडली आहे. त्यामुळे गाजीपूरचं आंदोलन आता कमजोर पडतं की काय अशी शक्यता दिसत असतानाच सरकारच्या अतिधाडसानं हे आंदोलन पुन्हा चर्चेत आणलं. संध्याकाळी कारवाईची चिन्हं दिसू लागल्यावर टिकैत शरण जातील अशी चर्चा प्रथम सुरु झाली. पण भाजपच्या आमदारांनी इथे गुंड पाठवल्याचा आरोप करत टिकैत यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला.
त्यातच प्रसंगी आत्महत्या करेन पण सरकारच्या दडपशाहीसमोर झुकणार नाही हे सांगताना टिकैत यांना अश्रू अनावर झाले. हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि तिकडे पश्चिमी उत्तर प्रदेशात त्याचे परिणाम दिसू लागले. शेतकरी नेते महेंद्रसिंह उर्फ बाबा टिकैत यांना पश्चिमी उत्तर प्रदेशच्या पट्ट्यातले शेतकरी मसीहाच मानतात. त्यांचा मुलगा राकेश टिकैत यांच्या डोळ्यातले अश्रू पाहिल्यानंतर अनेक शेतकरी गाझीपूरच्या दिशेनं पुन्हा येऊ लागले.
Farmer Protest: 'आता आपली बाजू निवडण्याची वेळ, मी लोकशाहीसोबत, शेतकऱ्यांसोबत' : राहुल गांधी
गाजीपूर सीमेवर आज दिवसभरात इतर पक्षांनीही आपला पाठिंबा जाहीर करायला उपस्थिती लावली. आपचे मनीष सिसोदिया इथे येऊन पाणी वगैरेची मदत कमी पडू देणार नाही हे सांगून गेले. शिवाय माजी पंतप्रधान चरणसिंह यांचे नातू जयंत चौधरीही टिकैत यांच्या बाजूला उभे राहिले. पश्चिम उत्तर प्रदेशात पक्षभेद विसरत जाट एक होऊ लागल्याचंच हे निदर्शक होतं.
दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झालेल्या हिंसाचारानं या आंदोलनाला गालबोट लागलं .त्यानंतर आता आंदोलन चिरडलं जाणार असं वाटू लागताच गाजीपूरच्या आंदोलनानं पुन्हा उर्जा दाखवली आहे. पण दुसरीकडे आंदोलनातल्या हिंसाचारप्रकरणी नेत्यांवरही कारवाईची टांगती तलवारही कायम आहे. त्यामुळे त्यातून पुढचं पाऊल सरकार काय टाकतं आणि आंदोलन कुठल्या वळणानं जातं हे पाहणं महत्वाचं असेल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)