चीनमधून तब्बल साडेसहा लाख टेस्टिंग किट्स भारतात दाखल
चीनमधून तब्बल साडेसहा लाख टेस्टिंग किट्स भारतात दाखल झाले आहेत. अँटीबॉडी टेस्ट, आरएनए एक्सट्रॅक्शन किट अशा दोन प्रकारचे हे किट आहेत. अँटीबॉडी टेस्ट ही अवघ्या 30 मिनिटांत होते. त्यामुळे भारतातल्या टेस्टचं प्रमाण झपाट्यानं वाढेल असं सांगितलं जातंय.

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या टेस्ट पुरेशा होत नाहीत, अशी टीका सुरु असतानाच त्याबाबत एक महत्वाची घडामोडी आज घडली. चीनमधून तब्बल साडेसहा लाख टेस्टिंग किट्स भारतात दाखल झाले आहेत. अँटीबॉडी टेस्ट, आरएनए एक्सट्रॅक्शन किट अशा दोन प्रकारचे हे किट आहेत. देशात कोरोनाबाधितांची संख्या 14 हजाराच्या आसपास पोहचली आहे. कोरोनाने 437 बळी देशभरात घेतलेत आणि 135 कोटी लोकसंख्येच्या देशात, कोरोनाच्या आजवर केवळ 2 लाख टेस्ट झालेल्या आहेत. टेस्टची ही संख्या पुरेशी नाही, असा आरोप होत असतानाच चीनमधून साडेसहा लाख टेस्ट किट्स भारतात दाखल झाले आहेत. रॅपिड अँटीबॉडी टेस्ट करणारे साडेपाच लाख किट्स आणि 1 लाख आरएनए एक्सट्रॅक्शन किटचा यात समावेश आहे.
देशात सध्या जी चाचणी होत आहे, त्यामध्ये थुकींचे नमुने घेऊन टेस्ट होत आहे. त्याला लागणारा वेळ आणि अँटीबॉडी टेस्टला लागणारा वेळ यात खूप फरक आहे. अँटीबॉडी टेस्ट ही अवघ्या 30 मिनिटांत होते. त्यामुळे भारतातल्या टेस्टचं प्रमाण झपाट्यानं वाढेल असं सांगितलं जातंय. पण अँटीबॉडी टेस्ट ही मुख्यता कोरानाचा व्हायरस किती वेगानं पसरतोय याचा अंदाज घेण्यासाठी, त्या दृष्टीनं लवकर सावधानतेची पावलं उचलण्यासाठीच कामाची आहे, असं तज्ज्ञांच मत आहे.
कुठल्याही रोगाची लागण झाल्यानंतर प्रतिकारशक्ती ही शरीरात अँटीबॉडीज तयार करते. त्या अँटीबॉडीज शरीरात आहेत की नाहीत याची तपासणी म्हणजे ही रॅपिड टेस्ट. देशात कोरोनाला हरवायचा असेल तर केवळ लॉकडाऊनवर विसंबून चालणार नाही, सरकारनं टेस्टिंगवर अधिक भर दिला पाहिजे असं काँग्रेस नेते राहुल गांधींनीही काल पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतात सोशल डिस्टन्सिंग किती प्रभावी ठरलं आहे याचा दाखला दिला होता. तर दुसरीकडे राहुल गांधींनी टेस्टिंगच्या बाबतीत आपण होंडुरास, नायजेरिया या देशांच्या रांगेत असल्याची टीका केली होती.
रॅपिड अँटीबॉडी टेस्टमुळे कोरोना नेमक्या कुठल्या भागात आपले पाय पसरतोय, किती वेगानं पसरतोय याची माहिती तातडीनं सरकारी यंत्रणांपर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आता त्याची वास्तवातली अंमलबजावणी किती यशस्वी ठरते हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल.
संबंधित बातम्या
- राज्याची आर्थिक घडी बसवण्यासाठी हालचाली सुरू; काही आर्थिक व्यवहारांना परवानगी
- आनंदाची बातमी! देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा वेग मंदावला : आरोग्य मंत्रालय
- धक्कादायक! कोरोनाच्या भीतीमुळे बाळासह गावी आलेल्या महिलेला कुटुंबाने प्रवेश नाकारला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
