(Source: ECI/ABP News/ABP Majha)
केरळमध्ये कोरोना व्हायरसचे तीन रुग्ण आढळले, मुख्यमंत्र्यांकडून राज्य आपत्तीची घोषणा
कोरोना व्हायरसचा भारतात तिसरा रुग्ण आढळला आहे. तिन्ही रुग्ण केरळमधील आहे. यामुळे केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून राज्यात आपत्तीची घोषणा केली आहे. हे तिघेही चीनमधून भारतात परतले होते.
तिरुवनंतपुरम : कोरोना व्हायरसचा चीनमध्ये कहर पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. या भयंकर अशा कोरोना व्हायरसचे रुग्ण भारतातही आढळले आहेत. केरळमध्ये तीन जणांना या व्हायरसचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. तीनही रुग्ण केरळचे रहिवासी आहेत, त्यामुळे कोरोना व्हायरसला केरळसमोरील मोठं संकट म्हणून घोषित करण्यात आलं आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी ही घोषणा केली आहे.
केरळचे आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी विधानसभेत बोलताना सांगितलं की, रविवारपर्यंत राज्यात 104 नमुन्यांची चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये तीन जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तिन्ही रुग्ण चीनमधून केरळमध्ये परतले होते. वुहानमधील विद्यापीठात शिक्षणासाठी गेलेल्या एका विद्यार्थ्याचा यामध्ये समावेश आहे. या विद्यार्थ्याला कासारगोडमधील कान्हानगड जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे.
इतर दोन रुग्णही चीनच्या वुहान शहरातून भारतात परतले होते. दोघे त्रिशूर आणि अल्पुझा येथील रहिवाशी आहेत. त्यामुळे केरळ सरकारने सर्वांनी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. केंद्र सरकारनेही कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. यासंबंधीची पहिली बैठक काल पार पडली. या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, हरदीप पुरी, ए जयशंकर, जी किशन रेड्डी, अश्विन कुमार चौबे हे उपस्थित होते.
कोरोना व्हायरस म्हणजे काय?
कोरोना व्हायरसचे विषाणू प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत पसरतात, असं म्हटलं जातं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, हा विषाणू समुद्री खाद्यपदार्थांशी निगडीत आहे. याची सुरुवात चीनच्या हुवेई प्रांताच्या वुहान शहरातील सीफूड मार्केटमधून झाली आहे. डब्ल्यूएचओने देखील हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.
लक्षणे कोणती आहेत ?
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवतात.
काय काळजी घ्याल?
तोंडाला मास्क लावा, बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा, हात वारंवार धुवावे, भरपूर पाणी प्या, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा, संक्रमित व्यक्तीपासून लांब राहा, तापासाठीचे आणि घसा खवखवण्यासाठीचे औषधे घ्या.
संबंधित बातम्या :