(Source: ECI/ABP News/ABP Majha)
इंदूरमध्ये लतादीदींच्या नावाने संगीत अकादमी आणि संग्रहालय, मध्य प्रदेश सरकारचा मोठा निर्णय
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोठी घोषणा केली आहे. इंदूरमध्ये दिवंगत लता मंगेशकर यांच्या नावाने संगीत अकादमीची स्थापना करण्यात येणार आहे.
Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे काल निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर विविध स्तरातून, देश विदेशातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोठी घोषणा केली आहे. इंदूरमध्ये दिवंगत लता मंगेशकर यांच्या नावाने संगीत अकादमीची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच एक संग्रहालयही बांधले जाईल, अशी माहिती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे.
लता मंगेशकर यांनी जी गणी गायली आहेत, ती गाणी संग्रहालयात उपलब्ध असणार आहेत. तसेच इंदूरमध्येच त्यांचा पुतळा बसवला जाणार आहे. दरवर्षी त्यांच्या जयंतीदिवशी लता मंगेशकर पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे. दरम्यान, चौहान यांनी आज स्मार्ट उद्यान भोपाळ येथे लता मंगेशकर यांना आदरांजली वाहिली. तसेच संगीतप्रेमींसोबत त्यांच्या हस्ते लतादीदींच्या स्मरणार्थ वृक्षारोपण देखील करण्यात आले. यावेळी चौहान म्हणाले की, लतादीदींच्या जाण्याने माझ्या मनात पोकळी निर्माण झाली आहे, जी भरून काढता येणार नाही.
लतादीदी या केवळ संगीतविश्वातील प्रकाश नव्हत्या, तर त्या देशातील मोठ मोठ्या राजकारण्यांच्या प्रेरणा देखील होत्या. दरवर्षी लतादीदींच्या जयंतीदिवशी मध्य प्रदेश सरकारतर्फे लता मंगेशकर पुरस्कार दिला जाणार आहे. दीदी आम्ही तुम्हाला विसरू शकणार नाही, त्यांच्या चरणी विनम्र श्रद्धांजली असे मुख्यमंत्री चौहान यांनी म्हटले आहे. लतादीदी या त्यांच्या गाण्यांमधून आणि संगीतातून आपल्यासोबत कायम राहतील. त्यांचा जन्म इंदूर येथे झाला. म्हणूनच आम्ही निर्णय घेत आहोत की इंदूरमध्ये त्यांच्या नावाने संगीत अकादमी सुरू केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे काल सकाळी निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यानंतर 30 जानेवारीला लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचे निधन झाले.
महत्त्वाच्या बातम्या: